मालवण /-

कोरोना महामारी विरोधातील लढाईमधील महत्वाचा टप्पा मानली कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम देशभर राबवली जात असून पर्यटननगरी असलेल्या मालवणमध्येही कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. मालवण ग्रामीण रुग्णालयात सोमवारी पहिली लस ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांना देण्यात आली. या लसीकरण मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी तहसीलदार अजय पाटणे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, सभापती अजिंक्य पाताडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कुबेर मिठारी, डॉ. कपिल मेस्त्री, आरोग्य सहायक एस. एम. नाईक यासह वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते. लसीकरण मोहिमेसाठी पहिल्या टप्प्यात ‘लसीकरण टीम’ नियुक्त करण्यात आली आहे. यात मेडिकल ऑफिसर के. के. मेस्त्री, स्टाफ नर्स व्ही. व्ही. जाधव, एस. व्ही. तेली, आयटी ऑफिसर एम. एस. चव्हाण, होमगार्ड पी. डी. भोजणे यांचा सहभाग आहे. शासनमान्य कोविशिल्ड लस आठवड्यातून पाच दिवस दर दिवशी १०० जणांना नोंदणी नुसार देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात शासकीय आरोग्य सेवेतील डॉक्टर, कर्मचारी यांना नोंदणी क्रमानुसार ही लस देण्यात येणार आहे. त्यांनंतर पोलीस, महसूल, नगरपालिका, शिक्षक व अन्य शासकीय क्षेत्रातील व्यक्तींना लसीकरण होणार आहे. लसीकरण साठी नोंदणी बंधनकारक आहे. मात्र गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, १८ वर्षाखालील मुले व दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींना लस दिली जाणार नाही. अशी माहिती डॉ. बालाजी पाटील यांनी दिली. दोन डोस प्रतिव्यक्ती अश्या स्वरूपात लसीकरण केले जाणार आहे. पहिला डोस घेतल्या नंतर त्या व्यक्तींना अर्धा तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जाणार आहे. त्यानंतर कोणताही काही त्रास न जाणवल्यास ती व्यक्ती आपल्या कामावर रुजू होऊ शकते. त्यानंतर २८ दिवसानी पुन्हा त्या व्यक्तीला लसीचा दुसरा डोस घ्यावा लागणार आहे. त्याबाबत आरोग्य विभाग त्या व्यक्तीला मोबाईलवर मेसेज पाठवून माहिती देणार आहे. लस घेतल्या नंतरही मास्क वापर गरजेचा आहे. त्याबाबरोबर हातांची स्वच्छता, सोशल डिस्टन्स बंधनकारक आहे. त्यामुळे या सर्वांची काळजी घेणे महत्वाचे राहणार आहे. अशी माहिती मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page