वेंगुर्ला /-
देशामध्ये महिलांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत.मुलींच्या शिक्षणासाठी राज्य व केंद्रशासन खूप मोठा निधी खर्च करतेय.मात्र स्थानिक स्तरावर याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही.आमच्या विविध संस्था तसेच जिल्हा बँकेमार्फत अनेक योजना राबवित आहोत.महिला सबलीकरण होत असताना मुलींचे शिक्षण आणि आरोग्य या गोष्टींना प्राथमिकता आवश्यक आहे,असे प्रतिपादन महिला काथ्या सहकारी संस्थेच्या
व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब यांनी वेंगुर्ला येथे केले.वेंगुर्ला दिवाणी न्यायालयाच्या वतीने व महिला काथ्या सहकारी संस्थेच्या सहकार्याने बालिका दिनानिमित्त संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.या कार्यक्रमाचे उदघाटन काथ्या संस्थेचे सल्लागार एम.के.गावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.यावेळी व्यासपीठावर ऍड.सुषमा प्रभू खानोलकर, ऍड.संदिप परब,सुरंगी संस्थेच्या अध्यक्षा सुजाता देसाई,महिला काथ्या सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब,विधी न्याय खात्याच्या श्रद्धा बाविस्कर,जिल्हा बँकेच्या अधिकारी रसिका कोठारी,दिवाणी न्यायालयाचे अधिक्षक नाईक,सावित्रीबाई फुले संस्थेच्या चेअरमन प्रविणा खानोलकर,श्रुती रेडकर,अश्विनी पाटील,सविता करंदीकर,आडेली माजी सरपंचा शुभांगी
गडेकर,रुपा गडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रमुख मार्गदर्शक ऍड.सुषमा प्रभूखानोलकर यांनी महिलांचे कायदे,महिलांची कर्तव्ये,जबाबदाऱ्या यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शन केले.महिलांनी महिलांचा सन्मान करायला पाहिजे,तरच महिलांचा विकास शक्य आहे.त्याचप्रमाणे मुलींना दुजाभाव देऊ नये.समाजामध्ये मुलगा आणि मुलगी असा फरक केला जातो. मात्र खऱ्या अर्थाने कुटुंब सक्षम करीत असताना मुलींना झुकते माप देणे आवश्यक आहे.कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन प्रज्ञा परब व आभार श्रद्धा बाविस्कर यांनी मानले.