नाथ पैंचा आदर्श वारसा जपण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार – पालकमंत्री उदय सामंत

नाथ पैंचा आदर्श वारसा जपण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार – पालकमंत्री उदय सामंत

नाथ पैंच्या जन्मशताब्दीनिमित्त वेंगुर्ल्यात होणार संकुल

सिंधुदुर्ग, दि.१७ : लोकनेते नाथ पै यांचं संपूर्ण जीवन दिपस्तंभाप्रमाणे असून त्यांचा आदर्श वारसा जपण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आज पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

अदिती पै यांनी लिहिलेल्या बॅरिस्टर नाथ पै लढवय्या देशभक्त । द्रष्टा लोकनेता । असामान्य संसदपटू या मराठी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत आज वेंगुर्ला येथे संपन्न झाला.

श्री. सामंत म्हणाले, नाथ पै यांचं व्यक्तिमत्व केवळ कोकण आणि महाराष्ट्र राज्यापुरते मर्यादित नसून ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नेते होते. आज त्यांच्या स्मृतींना उजाळा देत असताना त्यांनी केलेलं प्रचंड काम आपणा सर्वांसाठी प्रेरक असे आहे. नाथ पैंचा जीवनपट हा एक अग्निपथ होय. त्यात बेळगाव महाराष्ट्रात यावे तसेच मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून त्यांनी केलेल्या प्रखर संघर्षाचा आणि गोवा मुक्तीच्या कष्टप्रद लढ्याचाही समावेश आहे.

हे पुस्तक वाचत असताना नाथ पै यांच्या जीवनातील असंख्य गोष्टींची नव्याने ओळख झाली. या पुस्तकात एकूण ३५ प्रकरणे आहेत. प्रत्येक प्रकरणांत नाथ पै यांच्याबद्दल अत्यंत ओघवत्या शैलीत अदिती पै यांनी लिहिलं आहे. नाथ पै यांचं जीवन सर्वांगाने विशाल असताना ते अत्यंत मार्मिकपणे आणि स्पष्टपणे लेखिकेने या पुस्तकात मांडले आहे, असेही श्री.सामंत यावेळी म्हणाले.

नाथ पै यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांच्या नावे वेंगुर्ला येथे ५० लाख रुपये खर्च करून एक संकुल उभारण्यात येणार आहे. या संकुलात व्यायामशाळा, महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम तसेच त्यांचे साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल. या संकुलासाठी आणखी काही भरीव निधी लागला तर त्याची तरतूद ही करण्यात येईल. राज्यातील सर्व शासनमान्य ग्रंथालयात नाथ पैंचे हे चरित्र उपलब्ध करून देण्यात येईल, असे श्री.सामंत यावेळी म्हणाले.

श्री. सामंत म्हणाले, नाथ पैंच्या वक्तृत्वाबद्दल आपण सगळे जाणताच! लोकसभेतील त्यांच्या पहिल्याच प्रभावी आणि चमकदार भाषणाने त्यांनी सभागृह दणाणून सोडले होते. इतके की ते खुद्द पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनाही त्यांना चहापानाचे आमंत्रण दिल्यावाचून राहवले नाही. लोकसभेतील चौदा वर्षांची त्यांची कारकीर्द अत्यंत प्रेरक अशीच होती. या पुस्तकाच्या माध्यमातून नाथ पैंचे संपूर्ण आयुष्य आपणास समजून घेता येईल. प्रेरणेचा अखंड स्रोत असणाऱ्या नाथ पै यांच्या आयुष्याकडे पाहून आपणही या सम व्हावे, हा विचार तरुणाईच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही.

नाथ पैंचा संसदेतील वावर असो की त्यांची जनसामान्यांसोबत असलेली नाळ ही आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. कोकण रेल्वे सुरू करण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी प्रयत्न केले मात्र, कोकण रेल्वेच्या पूर्णत्वाचा निर्धार पै यांनी केलेला आपणास माहिती आहे. यामुळे नाथ पै हे कोकण रेल्वेचे खरे निर्माते आहेत, असे खासदार विनायक राऊत यांनी यावेळी सांगितले.

लहान मुलांना आणि विद्यार्थ्यांना नाथ पै समजण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करणे आवश्यक आहे. तसेच पैंच्या या स्मृतिदिनानिमित्त सीमावाद मिटावा हेच खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन ठरेल, असे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले.

यावेळी, संजय पडते, शैलेंद्र पै, देवदत्त परुळेकर, कमलताई परुळेकर, बापू अवसरी, उमेश गाळवनकर, जयप्रकाश चमनकार,अतुल बंगे, शैलेश परब, सुनील डुबळे, बाळू परब व संबंधित उपस्थित होते.

अभिप्राय द्या..