मुंबई /
– शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय वांद्रे येथे ग्रंथालय विभागाची आढावा बैठक श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत म्हणाले, राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे वेतन ऑफलाईन पद्धतीने होत असल्याने अडचणी येत आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत तक्रारी येत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रक्कम ग्रंथालयांच्या नावावर जमा होते. संस्थेचे पैसे संस्थेला मिळाले पाहिजेत व कर्मचाऱ्यांचे थेट त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणे आवश्यक आहे.
तसेच या कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन पद्धतीने झाले तर त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तसेच या कर्मचाऱ्यांना शासनमान्य ग्रंथालयांचे ग्रंथालय ओळखपत्र देण्याच्या सूचनाही यावेळी श्री. सामंत यांनी दिल्या.
तसेच निवडक शासनमान्य ग्रंथालयांमध्ये नवीन ग्रंथ विकण्याची परवानगी देण्याचाही प्रस्ताव तयार करावा. पुणे विभागीय ग्रंथालयाचे कामकाज सध्या तीन ठिकाणाहून चालत असून हे कामकाज एकाच ठिकाणाहून चालविण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. लोकमान्य टिळक स्मारक, रत्नागिरी व विभागीय ग्रंथालय रत्नागिरी यांच्या दुरुस्ती प्रस्तावाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. वाचन संस्कृतीला चालना मिळण्यासाठी व ग्रंथालय चळवळीला चालना देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरते ग्रंथालय हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा असेही श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले यासाठी नियमावली तयार केली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ.पी.गुप्ता, ग्रंथालय संचालिका शालिनी इंगोले व संबंधित अधिकारी उपस्थित होते.