सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना वॉरियर्स म्हणून चांगले काम केले आहे. कोणतीही भिती न बाळगता सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस घ्या व या मोहिमेस सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज केले. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आज जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा शुभारंभ झाला त्यावेळी त्या बोलत होत्या.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्टाफ नर्स अलका सांगवेकर यांना केंद्रावर पहिल्यांदा लस टोचून आज जिल्ह्यातील कोवीड लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, आरोग्य सेवा विभाग कोल्हापूरचे उपसंचालक डॉ. हेमंत बोरसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विजय नांद्रेकर, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अपर्णा गावकर, डॉ. संदेश कांबळे यांच्यासह आरोग्य विभागाचे डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी लाभार्थींचे अभिनंदन केले. आरोग्य विभागाने कोरोनाच्या काळात चांगले काम केले आहे. त्यामुळेच पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देता येणार आहे. लसीकरणासाठीच्या तयारीसाठी आरोग्य विभाग व जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
लसीकरणावेळी सुरुवातीस लाभार्थ्यांची ओळख पटवण्यात आली. त्यासाठी लाभार्थीचे छायाचित्र असलेले कोणतेही एक ओळखपत्र घेण्यात आले. त्यानंतर त्यांना प्रतिक्षा कक्षामध्ये बसविण्यात आले. प्रतिक्षा कक्षानंतर त्यांची नोंदणी करण्यात आली. नोंदणी नंतर लाभार्थींना लस देण्यात आली. लस देतेवेळी लसीकरण करणाऱ्या डॉक्टर्स व नर्सनी त्यांचे लसीविषयी सामुपदेशन केले. त्यानंतर त्यांना अर्ध्या तासासाठी निरीक्षण कक्षामध्ये ठेवण्यात आले होते. या प्रमाणे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून पहिल्या लाभार्थीचे लसीकरण करण्यात आले. तसेच यावेळी केंद्रावरील दुसऱ्या लाभार्थी अमिता हरकूळकर यांनाही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लस देण्यात आली.

जिल्ह्यासाठी सिरम इन्स्टीट्यूट निर्मीत कोविशिल्ड लसीचे 10 हजार 260 डोसेस उपलब्ध झाले आहेत. तसेच लसीच्या एक हजार 26 व्हायल्स तसेच इंजेक्शनसाठी 12 हजार 600 सिरींज मिळाल्या आहेत. ही लस 2 ते 8 सेंटिग्रेड तापमानास साठविली जाते. एक व्हायल 5 मि.ली. ची असून प्रत्येक व्यक्तीस 0.5 मि.ली. एवढा डोस देण्यात येत आहे. या लसीचे दोन डोस घेणे गरजेचे आहे. दोन डोसच्या मध्ये 4 ते 6 आठवड्यांचे अंतर असणार आहे.
ज्या व्यक्तींना यापूर्वी कोणत्याही लसीची ॲलर्जी आहे, रक्तासंबंधी आजार आङेत, रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, गरोदर माता, स्तनदा माता यांना लस देताना विशेष काळजी घेण्यात येणार आहे. तर डोकेदुखी, उलटी, मळमळ, पोटदुखी, चक्कर येणे, सांधे दुखी, इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना, खाज येणे, पुरळ येणे हे लसीचे सर्वसाधारण दुष्परीणाम आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी सह उपजिल्हा रुग्णालय, कणकवली व सावंतवाडी येथेही लसीकरणास सुरुवात झाली आहे. प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी 100 लाभार्थींना लस देण्यात येणार आहे. पुढील चार आठवडे, प्रति आठवडा चार अशा प्रकारे एकूण 16 सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 4 हजार 500 लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार आहे.
लसीकरणाच्या ठिकाणी 4 व्हॅक्सिनेशन ऑफिसर, 2 व्हॅक्सिनेटर नियुक्त करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page