मुंबई/-

विद्यार्थी व पालक यांच्याकडून प्राप्त झालेल्या विनंती अर्जाच्या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण विभागातील पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी दिनांक २० जानेवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.

श्री.सामंत म्हणाले, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील उच्च व तंत्रशिक्षण विभागातील शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता प्रवेश घेणाऱ्या पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या उमेदवारांसाठी EWS मुळ प्रमाणपत्र, NCL मुळ प्रमाणपत्र, मुळ जात पडताळणी प्रमाणपत्र (CVC) सादर करण्यासाठी दिनांक २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता हा निर्णय घेतला असून याचा सर्व बाधित विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.

वाढवण्यात आलेली मुदतवाढ ही अंतिम असून या नंतर कोणत्याही स्वरूपाची तारीख वाढवून देण्यात येणार नसून याची नोंद विद्यार्थी व पालकांनी घ्यावी. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आमचा विभाग कायम तत्परतेने कार्यरत असून विद्यार्थी हितासाठी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

श्री.सामंत म्हणाले, पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व उमेदवारांनी दिनांक २०/०१/२०२१ पर्यंत स्वत:च्या लॉगीनमधुन ऑनलाईन पध्दतीने मुळ प्रमाणपत्र सादर करावी. जे उमेदवार मुळ प्रमाणपत्र दिनांक २०/०१/२०२१ सायंकाळी ०५.०० पर्यंत सादर करणार नाही. अशा उमेदवारांचा प्रथम फेरीतील प्रवेश रद्द करुन त्यांना दुसऱ्या फेरीकरीता खुल्या वर्गातून पात्र ठरविण्यात येईल याची नोंद घ्यावी.

ज्या उमेदवारांनी वरील तीन प्रमाणपत्राकरीता अर्ज केल्याची पावती ऑनलाईन अर्ज करताना सादर केलेली आहे, अशाच उमेदवारांना ही मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच पुढील सुधारीत वेळापत्रक दिनांक १८/०१/२०२१ नंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे श्री. सामंत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page