देवगडच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही..
सिंधुदुर्ग /-
विकासाला समोर ठेऊन सिंधुदुर्ग वासीयांनी पाच वर्षांसाठी ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद अशी एकहाती सत्ता शिवसेना व महाविकास आघाडीच्या हाती द्यावी,असे आवाहन आज पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे केले.
श्री.सामंत म्हणाले, देवगडच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही.या भागाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. केवळ राजकारणासाठी राजकारण न करता विकासाचे राजकारण करणारा शिवसेना हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.
माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारकडून कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाताहेत. वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती असो अथवा चिपी विमानतळाचे काम असू माननीय खासदार विनायक राऊत साहेबांनी यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत. येत्या काही दिवसात चिपी विमानतळावरून माझा शेतकरी राजा मुंबई – दिल्ली या शहरात अगदी कमी वेळात आणि माफक दरात जाऊ शकणार आहे, असेही श्री. सामंत यावेळी म्हणाले.
आज शिवसेना देवगड तालुका कार्यकर्ता मेळावा पालकमंत्री श्री.सामंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. ग्रामपंचायत निवडणूकित शिवसेना व महाविकास आघाडीच्या सर्व पॅनेलला प्रचंड बहुमताने विजयी करा, असेही आवाहन यावेळी त्यांनी केले. आज या मेळाव्यात अनेकांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या मेळाव्यास, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, अप्पा पराडकर, अतुल रावराणे, युवा नेते संदेश पारकर, तालुका प्रमुख विलास साळसकर, तालुका प्रमुख मिलिंद साठम, सौ.पूर्वा सावंत, रविंद्र जुगल, निनाद देशपांडे व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.