सिंधुदुर्ग /-
कृषी विधेयकाच्या विरोधात दिल्लीत सुरू..असलेल्या आंदोलनाबाबत कोकणातील शेतकऱ्यांनी गाफील न राहता त्या आंदोलनाला समर्थन द्यावे असे आवाहन कृषिभूषण एम के गावडे यांनी केले आहे.
यावेळी बोलताना एम के गावडे म्हणाले की, दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाकडे केंद्र सरकारने जाणून बुजून दुर्लक्ष केला आहे. आजपर्यंत या आंदोलनात ४० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे हे आंदोलन भाजप ला निश्चितच महाग पडणार यात कोणताही संशय नाही. केंद्र सरकारने हे कृषी विषयक कायदे त्वरित मागे घेऊन शेतकरी संघटनेच्या सूचनांप्रमाणे आवश्यकते बदल करून पुन्हा ते कायदे लागू करण्यात कोणतीही हरकत नव्हती मात्र पंतप्रधान मोदी यांचा इगो यामध्ये आडवा येत आहे. भाजप सरकारने तात्काळ यामध्ये तोडगा काढून शेतकरी आंदोलन संपवण्यात यावे व निरपराध शेतकऱ्यांचे बळी थांबवल्यास निश्चितपणे शेतकऱ्यांचे समाधान होईल.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने एपीएमसी शिवाय इथला आंबा व्यापारी किंवा शेतकरी आज काही करू शकत नाही. मॉल मध्ये काही लोकांचे आंबे विकले म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या आंब्याला भाव मिळाला अस नाही. तसेच या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चे काढणाऱ्यांना माझा असा सवाल आहे की, १७० रु प्रति किलोचा काजू बी ८० रुपयांनी विकावी लागली याला कारणीभूत कोण? यामुळे माझे प्रामाणिक मत आहे की, केंद्र सरकारने आयात शुल्क कमी केल्यामुळेच आफ्रिकन काजूचे दर कमी झाले आणि स्थानिक काजू बी ला याचा फटका बसला. म्हणून शेतकऱ्यांनी वेळीच जाग होऊन स्वत:च्या एकत्र येणे गरजेचे आहे. आज सरकारने जर भात खरेदी केली नसती तर जो आज २५०० दर मिळाला तो ११०० च्या खाली मिळाला असता. म्हणून शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन आहे आम्हाला काय असं न म्हणता या कायद्याचा कडाडून विरोध केला पाहिजे. आणि शेतकऱ्यांनी जाग होऊन दिल्लीच्या आंदोलनाला समर्थन द्यावे असे आवाहन कृषिभूषण एम के गावडे यांनी केले आहे.