आता मिळणार संपूर्ण सवलत मालमत्ता कराच्या दंडावर..ठाणे महापालिकेची योजना…

आता मिळणार संपूर्ण सवलत मालमत्ता कराच्या दंडावर..ठाणे महापालिकेची योजना…

ठाणे :

करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने सर्वत्र टाळेबंदी लागू केली. या काळात नागरिकांवर आर्थिक संकट ओढवले होते. टाळेबंदी शिथिलीकरणानंतर बाजारपेठा, दुकाने आणि उद्योगधंदे सुरू झाले आहेत. असे असले तरी आजही अनेक नागरिकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो आहे. या पार्श्वभूमीवर थकीत मालमत्ता कराच्या दंडाच्या रकमेवर सवलत देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून यामुळे थकबाकीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
महापालिकेचा थकीत आणि चालू वर्षांचा मालमत्ता कर ३१ जानेवारीपर्यंत भरा आणि दंडाच्या रकमेवर शंभर टक्के सवलत मिळावा, अशी योजना महापालिकेने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुटीच्या दिवशी कर संकलन केंद्र सुरू ठेवण्याचाही निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
या योजनेनुसार ३१ जानेवारीपर्यंत थकीत आणि चालू मालमत्ता कराची रक्कम एकत्रित भरली तर, त्यावरील दंड आणि शास्तीच्या रकमेत शंभर टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना केवळ निवासी मालमत्ताधारकांसाठी लागू असणार आहे.

या योजनेंतर्गत ऑनलाइन पद्धतीने www.propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर तसेच www.digithane.thanecity.gov.in या डीजी ठाणे अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिकेच्या संकलन केंद्रावरही रोख, धनादेश, धनाकर्ष, क्रेडिट, डेबिट कार्डच्या माध्यमातूनही मालमत्ता कर भरण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. महापालिकेची संकलन केंद्रे सोमवार ते शुक्रवार सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तर सार्वजनिक सुट्टी आणि सर्व शनिवारी सकाळी १०.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहेत.

अभिप्राय द्या..