अहमदनगर :

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे लग्न‌ समारंभात 100 हून अधिक वऱ्हाडी मडळींना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नातील जेवणातून ही विषबाधा झाल्याचे बोललं जात आहे. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
टाकळीमिया येथील काळे कुटुंबिय आणि कोल्हार ‌येथील कडसकर यांचा शुभविवाह आज रविवारी दुपारी 1 च्या सुमारास पार पडला. या विवाह सोहळ्यात अनेकांनी जेवणावर ताव मारला. जेवणानंतर काही वेळातच अनेकांना उलट्या, जुलाब आणि मळमळीचा त्रास जाणवू लागला. यानंतर लग्न सभारंभातील वऱ्हाड्यांनी आसपासच्या रुग्णालयात फोन केला.

विषबाधा झालेल्या सर्व वऱ्हाड्यांवर राहुरी कारखाना येथील विवेकानंद नर्सिंग होम , लोणी येथील प्रवरा हॉस्पिटल , राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. विषबाधा झालेल्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

या विवाह समारंभात गोड पदार्थ म्हणून रबडी ठेवण्यात आली होती. ही रबडी खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. सुदैवाने अद्याप कोणाचीही प्रकृती गंभीर नाही. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांना विषबाधा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली याची माहिती घेण्याचे काम सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page