मालवण /
तारकर्ली येथील ग्रामस्थांना इण्डेन गॅस एजन्सीमार्फत नियमित वेळेत गॅस सिलेंडर घरपोच केला जात नसल्याने आज तारकर्ली येथील ग्रामस्थ व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मालवण इण्डेन गॅस एजन्सीच्या कार्यालयावर धडक दिली. नियमित वेळेत घरपोच गॅस सिलेंडर देण्याबाबत येत्या ८ जानेवारीपर्यंत नियोजन करण्यात यावे. अन्यथा येत्या १० जानेवारी रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी मनसे कार्यकर्ते व तारकर्ली ग्रामस्थांनी दिला.
तारकर्ली येथील ग्राहकांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी मनसेकडून घरपोच गॅस सिलेंडरसाठी इण्डेन गॅस एजन्सीला निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, तारकर्ली इण्डेन गॅसधारकांना दर शुक्रवारी एजन्सीचे सहकारी संघाची गॅस सिलेंडर डिलिव्हरी गाडी घरपोच गॅस सिलेंडर डिलिव्हरीसाठी वेळो अवेळी तारकर्ली गावात आपल्या मनमानी कारभारानुसार येते. ग्राहकांना शुक्रवार सकाळी दहा ते सायंकाळी पाचवाजेपर्यंत गॅस सिलेंडर रस्त्यावर घेऊन ताटकळत उभे राहावे लागते. ग्राहकाला योग्य ते वजन न करता व घरपोच गॅस सिलेंडर डिलिव्हरी न देता गॅस सिलेंडर घेत रस्त्यावर राहण्यास भाग पाडले जाते. नियमित वार ठरलेला असून देखील गाडी कधी देवबाग तर कधी देवलीला जाते व कधीकधी गॅस सिलेंडर वितरीत न करताच माघारी परतते. यावेळी गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे असे तोंडी सांगितले जाते. घरपोच सिलेंडर न देता कंपनीच्या नियमाप्रमाणे ग्राहकाला भाड्यापोटी परतावा रक्कमही दिली जात नाही. तर गोडावून मधून सिलेंडर आणल्यास पंधरा रुपये ही परतावा रक्कम खूपच कमी आहे. या सर्व गोष्टींचा ग्राहकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत इण्डेन गॅस एजन्सीच्या सहकारी संघाने विचार करावा. येत्या ८ जानेवारीपर्यंत ग्राहकांना नियमित वेळेवर घरपोच गॅस सिलेंडर न मिळाल्यास १० जानेवारीनंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. ग्राहकांच्या रागाचा उद्रेक होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडली तर याला सर्वस्वी जबाबदारी सहकारी संघाची राहील असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी उपजिल्हाध्यक्ष शैलेश अंधारी, देवबाग विभाग अध्यक्ष बजरंग कुबल, तारकर्ली शाखाध्यक्ष प्रसाद बापर्डेकर, मनविसे विभाग अध्यक्ष प्रतीक कुबल, मनविसे उपतालुकाध्यक्ष संकेत वाईरकर, मनविसे शहराध्यक्ष साईराज चव्हाण, उपतालुकाध्यक्ष विशाल माडये आदी उपस्थित होते.