……तर जनतेसाठी भाजपा तीव्र आंदोलन छेडेल !

……तर जनतेसाठी भाजपा तीव्र आंदोलन छेडेल !

गैरसोयीच्या कुडाळ बसस्थानकाबद्दल भाजपा नेते आम.रविंद्र चव्हाण यांनी परिवहन मंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी.
➖➖➖➖➖➖➖➖

कुडाळ बसस्थानक हा सरकारी निधी उत्तम पद्धतीने कसा वाया घालवायचा याचा उत्तम नमुना आहे. अतिशय निकृष्ट आणि चुकीचे बांधकाम, प्रवाशांची होणारी प्रचंड गैरसोय आणि अस्वच्छता यामुळे प्रवाशांचे केवळ हालच होणार नसुन भविष्यात त्यांच्या आरोग्याला व जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. फलाटाची धोकादायक स्थिती, स्वच्छतागृहाची चुकीची जागा, बैठकीची अपुरी व्यवस्था, ऊन आणि पावसासाठी संरक्षणाची उणीव यासारख्या अनेक तक्रारी जनतेमधून येत असताना याची पाहणी करण्याची साधे नैतिक कर्तव्यदेखील पार पाडण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. या बसस्थानकाचा उदघाटन सोहळा घाईगडबडीने ऑनलाईन उरकून घेण्याच्या प्रकारावर भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार श्री रविंद्रजी चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बसस्थानकाच्या दुर्दशेबाबत त्यांनी थेट परिवहन मंत्री श्री. अनिल परब यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करत सर्व समस्या त्यांच्या कानावर घातल्या.

पत्रकारांशी बोलताना त्यांनी या विषयासोबतच शासन आणि एसटी प्रशासनाकडून जनतेच्या सुरक्षेबाबत चालवलेल्या हेळसांडीवरही टीका केली. गेले अनेक दिवस सातत्याने वरच्या अधिकाऱ्यांना कर्मचारी सांगत आहेत की आपल्याकडे वाहनासाठी टायरची व्यवस्था नाही, ती तातडीने करा. पण त्याकडे दुर्लक्ष चालले आहे. या गोष्टी छोट्या असल्या तरी महत्वाच्या आहेत. खेड्यापड्यातून प्रवास करतांना जनतेच्या जीवाशी हा खेळ चालला आहे. शासन म्हणून ही व्यवस्था लवकर न झाल्यास व कुडाळ बसस्थानकासंबंधीच्या या सर्व समस्यांचे निराकरण तातडीने करण्यात न आल्यास नाईलाजाने जनतेच्या हितासाठी भाजपाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल, त्याची आताच जाहीर पूर्वसूचना देत असल्याचे सांगत आमदार रविंद्र चव्हाण यांनी भाजपाच्या तीव्र आंदोलनासाठी सज्ज राहण्याचा इशाराही शासन व एसटी प्रशासनाला दिला आहे.

अभिप्राय द्या..