खदानीत बुडत असलेल्या आई आणि लहान बहीण यांना वाचवण्याच्या प्रयत्नांत १६ वर्षांची मुलगी पाण्यात बुडाल्याची घटना डोंबिवलीजवळच्या कोळीवली परिसरात घडली असून अग्निशमन दलाचे जवान या मुलीचा शोध घेत आहेत.
कोळीवली परिसरात राहणारी गीता नावाची महिला आपली चार वर्षांची मुलगी परी आणि १६ वर्षांची मुलगी लावण्या या दोघींना बरोबर घेऊन नेहमीप्रमाणे खदानीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. आई आणि मोठी बहीण कपडे धूत असताना, पाण्यात खेळत असलेली चार वर्षांची परी ही पाय घसरल्याने खदानीत पडली. ती बुडू लागल्याने तिची आई गीता हिने पोहता येत नसतानाही पाण्यात उडी मारली. मात्र तीदेखील पाण्यात बुडू लागली. ते पाहून घाबरलेल्या १६ वर्षांच्या लावण्यानेदेखील पाण्यात उडी मारली आणि बुडणारी आई आणि लहान बहीण यांना आधार देत पाण्याबाहेर ढकलले. याच दरम्यान ती स्वत: खोल पाण्यात पडल्याने बुडाली. तिची आई आणि बहीण सुरक्षित पाण्याबाहेर पडली. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिस आणि अग्निशमन विभागाचे जवान लावण्याचा शोध घेत असून आहेत. तिच्या धाडसाचे कौतुक करतानाच परिसरातील रहिवाशांचे लक्ष शोधकार्याकडे लागले आहे.