मालवण आडारी डम्पिंग ग्राउंडला पुन्हा दुसऱ्यांदा आग…

मालवण आडारी डम्पिंग ग्राउंडला पुन्हा दुसऱ्यांदा आग…

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी केली चौकशीची मागणी…..

मालवण /
नगरपालिकेच्या आडारी डंपिंग ग्राउंड येथे रविवारी रात्री पुन्हा एकदा आग लागली. डम्पिंग ग्राऊंड येथे महिनाभरातील ही आगीची दुसरी घटना आहे.

येथील कचऱ्याला लागलेली आग वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर अधिकच भडकत होती. आगीच्या ज्वाळा व धुराचे लोट परिसरात पसरले होते.

घटनेची माहिती मिळताच पालिका कर्मचारीही तात्काळ दाखल झाले. तर माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर हेही घटनास्थळी पोहोचले.

आगीच्या बाजूला वीज वितरणचे वीज खांब असल्याने नगरसेवक आचरेकर व पाटकर यांनी वीज वितरणशी संपर्क साधून वीज पुरवठा खंडित करण्याबाबत सूचना केल्या. तसेच अन्य यंत्रणेसही माहिती दिली. आग बाजूला पसरून स्थानिक नागरिकांच्या आंबा बागांना कोणताही धोका पोहचू नये यासाठी कर्मचाऱ्याना लक्ष ठेवण्याबाबत सूचना आचरेकर, पाटकर यांनी दिल्या. तसेच आपणही उशिरापर्यंत घटनास्थळी थांबून होते.

आग विझविण्यासाठी अग्निशमन यंत्रणा पालिकेकडे उपलब्ध नसल्याने अन्य नगरपालिकांशी संपर्क साधून अग्निशमन उपलब्धते बाबत विचारणा सुरू होती. दरम्यान, धुराचे लोट मोठ्या प्रमाणात असल्याने कर्मचाऱ्यांना आग विझवण्यात अडचणी येत होत्या. आगीवर पाणी मारण्यासाठी पंपही पालिकेकडे उपलब्ध नसल्याने दीपक पाटकर यांनी नाराजी व्यक्त केली.

आगीच्या वारंवार घटनांमुळे त्यावर नियंत्रण मिळवताना पालिका कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. दिवसभर काम करून रात्री तासंतास आग विझविण्यात हे कर्मचारी गुंतून पडत आहेत.

कणकवली येथून अग्निशमन दाखल

पालिका कर्मचारी आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते. रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात काहीसे यश आले मात्र आग धुमसत होती. रात्री उशिरा कणकवली नगरपंचायतचा अग्निशमन दाखल झाल्यानंतर मध्यरात्री आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. अशी माहिती स्वच्छता निरीक्षण विजय खरात यांनी दिली.

आग लावली तर जात नाही ना ?

डम्पिंग ग्राउंड येथे लागणारी ही आग लावली जात असल्याचा दाट संशय आहे. यापूर्वी कधीही आग लागण्याच्या घटना वारंवार घडत नव्हत्या. स्थानिक नागरिक असे कृत्य करणार नाही. आताच होणारे हे प्रकार कोणी मुद्दामहून तर करत नाही ना. याचाही पालिकेने शोध घ्यावा. कचरा डंपिंग ग्राऊंग येथे कचरा विलगिकरण करण्यासाठी पालिकेने २८ लाख भाडे करारपोटी कचरा विलगिकरण प्लांट आणला. कचरा संपला की ठेकेदार मशनरी घेऊन जाणार आहे. मात्र तो प्लांट आल्यापासून ही आगीची दुसरी घटना आहे. त्यामुळे यात काही गौडबंगाल तर नाही ना. त्या दृष्टीनेही नगरपालिकेने चौकशी करावी. अशी मागणी सुदेश आचरेकर यांनी केली आहे.

अभिप्राय द्या..