फोंडाघाट येथील संजीवनी सावंत मुंबईमध्ये कोरोना योद्धा..

फोंडाघाट येथील संजीवनी सावंत मुंबईमध्ये कोरोना योद्धा..

मसुरे /-

कोरोनाच्या महामारीत मागील नऊ महिने कर्तव्य निभावत आहे तो आरोग्य विभाग. मुंबईसारख्या मोठ्या मायानगरीत कोरोना रुग्णांना रुग्णालये कमी पडत असतानाही व सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती असताना या रुग्णांना सावरण्याच्या कामात खारीचा वाटा उचलला तो फोंडाघाट ब्रम्हा नगरी गावची एक कन्या संजीवनी सुधाकर सावंत यांनी. मुंबई मुलुंड येथील प्लॅटिनम हॉस्पिटल मध्ये कोरोना योद्धा म्हणून प्राणपणाने लढत आहे. गेले नऊ महिने संजीवनी प्रामाणिकपणे आणि जीवावर उदार होऊन याठिकाणी रुग्णांची सेवा करत आहे. आणि फावल्या वेळेत त्या हरी भाजनाचा छंद सुद्धा जोपासतात.
मुलुंड येथील प्लॅटिनम हॉस्पिटल हे एक प्रसिद्ध हॉस्पिटल. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोना ग्रस्त रुग्ण हे दाखल झाले होते. या सर्व रुग्णांच्या सेवेमध्ये संजीवनी सावंत यांनी अगदी झोकून घेतले होते.सोबतचे सहकारी पॉझिटिव्ह येत असताना संजीवनी या न डगमगता आपली आठवड्याची सुट्टी ही न घेता या रुग्णांना आरोग्य विषयी मदत करत होत्या.
कुमारी संजीवनी सुधाकर सावंत या २०१७ साली रिसेप्शनिस्ट म्हणून कामावर रुजू झाल्या नंतर सध्या त्या एजीएम म्हणून काम करत आहेत. संजीवनी हीची दुसरी ओळख म्हणजे त्या एक सुप्रसिद्ध महिला भजनी बुवा आहेत .मुंबई मध्ये त्यांच भजनी क्षेत्रांमध्ये मोठे नाव आहे. प्रसिद्ध भजनी बुवा गुरुवर्य श्री संजय गावडे बुवा यांच्या त्या पट्टशिष्या आहेत. या धकाधकीच्या जीवनात हॉस्पिटल सारख्या नोकरीतून वेळ काढून परमेश्वराचे नामस्मरण करून भजनी परंपरा जपत आहेत.काही वेळा रुग्णांचे मन रीजवण्यासाठी ही भजनाच्या माध्यमातून त्या सेवा देत आहेत. सुरुवातीला त्या थोड्या द्विधा मनस्थितीत होत्या कारण कोरोना रुग्णांची भयानक स्थिती पाहून त्याही हादरल्या होत्या. परंतु देश सेवा करणे त्यावेळी काळाची गरज होती हे ओळखून संजीवनी हिने या रुग्णसेवेत प्राधान्य दिले.
यावेळी बोलताना संजीवनी सांगते, सुरुवातीच्या काळात कोरोनाची भीती इतकी वाटत होती की काही क्षण हे काम नको असाही मनाकडे विचार येत असल्याचे वाटत होते परंतु याच वेळी माझ्या घरच्या परिवाराने, गुरू संजय गावडे यांनी मला आत्मविश्वास दिला. तर वरिष्ठ अधिकारी वर्गाने मला प्रोत्साहन दिले. यामुळेच मनाकडे निश्चय करुन हीच खरी देश सेवा आहे असं समजून रुग्णसेवेचा प्राधान्य दिले. या काळात परिचारिका ड्युटी वरती कमी असल्याने ज्यादा कामही करण्याचे शिवधनुष्य उचलावे लागत होते. परंतु आपण कधीही ही यासाठी डगमगले नाही. साक्षात मृत्यूचं तांडव समोर असतानाही मी माझे काम प्रामाणिकपणे करत राहिले आणि यापुढेही करत राहणार आहे. संजीवनी यांच्या योगदानाबद्दल कौतुक होत आहे.

अभिप्राय द्या..