खबरदार मांजरींना पोसाल तर,५००₹ दंड!

खबरदार मांजरींना पोसाल तर,५००₹ दंड!

 

मुंबई /- एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात मांजरीची संख्या वाढली आहे. अधिकारी कर्मचारीच मांजरी पोसत असून, त्यांना अन्न सुद्धा खायला देत असल्याने मुख्यालयात विष्ठेची घाण पडलेली असून घाणीच्या दुर्गंधीमुळे हैराण झाले आहे. त्यामुळे मुख्यालयात मांजरी पोसतांना किंवा अन्न देतांना आढळून आल्यास चक्क 500 रुपये दंड देण्याचे आदेशच एसटीच्या वाहतूक विभागाच्या उपमहाव्यवस्थापकांनी काढला आहे.

कोविड – 19 च्या माहामारीमूळे एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी एसटी बस स्थानके, परिसर, बस गाड्या स्वच्छ ठेवण्यावर भर दिला आहे. मात्र, दुसरीकडे एसटीच्या मध्यवर्ती मुख्यालयातच मांजरीवर प्रेम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चुकीमूळे कार्यालयातच घाण निर्माण झाली आहे. यापुर्वी मध्यवर्ती कार्यालयातील स्वच्छतेसाठी खासगी कंपनीला कंत्राट दिले होते त्यामूळे नियमीत सफाई केली जात होती. मात्र, आता रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांकडून साफसफाई केली जात असून काही दिवसांपासून सफाईकाम बंदच असल्याने मांजरीच्या घाणीचा प्रकार उघड झाला आहे.

या मध्यवर्ती कार्यालयात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ऍड. अनिल परब यांचे कार्यालय आहे. त्यासोबतच इतर विभागातील महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापकांसह एसटी महामंडळाचा राज्याचा कारभार या कार्यालयातून चालविण्यात येते. मात्र, मुख्यालयातच सफाईची दैना अवस्था असल्याचे दिसून येत आहे. शिवाय कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला सुद्धा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामूळे एसटीच्या कार्यालयात जर जास्त मांजर प्रेम दाखवून पोसत असल्यास किंवा त्यांना अन्न देतांना दिसून आल्यास किंवा इतरांनी तक्रार केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे.

अभिप्राय द्या..