नवी मुंबई: हार्बर रेल्वे मार्गावरून सीएसएमटी ते पनवेल लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका तरुणाला पाच जणांच्या टोळीने सीवूड्स ते बेलापूरदरम्यान धावत्या लोकलमध्ये बेदम मारहाण करून त्याच्याजवळची रोख रक्कम, एटीएम कार्ड व इतर वस्तू लुटून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. पवनेल रेल्वे पोलिसांनी या प्रकरणातील टोळीविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

या घटनेतील तक्रारदार तरुणाचे नाव मोहम्मद आरिफ शेख (२०) असे असून तो धारावी परिसरात राहतो. मोहम्मदचा मित्र राहुल मंडल हा नवी मुंबईत राहण्यास असून, त्याला मोबाईल फोन देण्यासाठी मोहम्मद सोमवारी पहाटे लोकलने जात होता. यासाठी त्याने पहाटे ४.५५ची जीटीबी रेल्वे स्थानकातून पनवेल लोकल पकडली होती. सदर लोकल कुर्ला रेल्वे स्थानकात आल्यानंतर मोहम्मद बसलेल्या मालडब्यात २० ते २२ वयोगटातील पाच तरुण चढले. त्यातील एकाने मोहम्मदकडे पैशाची मागणी केली. त्यानंतर लोकल सीवूड्स रेल्वे स्थानकात आल्यानंतर या पाच जणांनी मोहम्मदला धमकावून त्याच्याकडे ५०० रुपयांची मागणी करण्यास सुरुवात केली. मोहम्मदने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यातील दोघांनी त्याला पाठीमागून पकडून ठेवले. त्यानंतर इतरांनी त्याच्या छातीवर वा तोंडावर बेदम मारहाण करून त्याच्या खिशातील ३५० रुपये व त्याचे एटीएम कार्ड, कामाचे ओळखपत्र काढून घेतले.

या मारहाणीत मोहम्मद जखमी झाल्यानंतर पाचही तरुणांनी बेलापूर रेल्वे स्थानकात उतरून पलायन केले. त्यानंतर मोहम्मदनेदेखील बेलापूर रेल्वे स्थानकात उतरून तेथील टीसीला घडल्या प्रकाराची माहिती दिली. टीसीने त्याठिकाणी रेल्वे पोलिसांना बोलावून घेतल्यानंतर पनवेल रेल्वे पोलिसांनी या प्रकरणातील पाच तरुणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page