पुणे: नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करून त्यात अंमली पदार्थांचे सेवन केले जाते. त्या अनुषंगाने अंमली पदार्थांच्या तस्करीवर नजर ठेवली जात होती. त्यावेळी लोहमार्ग विभागाचे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांना हिमाचल प्रदेशातील त्यांच्या बॅचच्या आयपीएस अधिकाऱ्याने अंमली पदार्थाच्या तस्करीबाबत माहिती दिली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व लोहमार्ग पुणे यांची चार पथके तयार केली. ज्या रेल्वे दिल्लीहून पुण्यात येतात. त्यांच्यावर सतत सात दिवस ५० जणांचे पथक लक्ष ठेवून होते.

पुणे रेल्वे स्थानक परिसरातील वाडिया पुलाच्या खाली १९ डिसेंबर रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास दोन व्यक्ती अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांनी तीन पथके तयार करून सापळा रचला. त्यात दोघे अडकले. या घटनेची माहिती तात्काळ नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे संचालक समीर वानखेडे यांना दिली. त्यांचे देखील अधिकारी मदतीला आले. या आरोपींची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे ३४ किलो ४०४ ग्रॅम चरस आढळून आले. हे चरस हरियाणातील मनालीपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या मनाला जवळील गावात बनवले जात असल्याचे समोर आले आहे. एक ग्रॅमची तीन हजार रुपयांना विक्री केली जाते. त्यामुळे या चरसच्या विक्रीतून तस्करांना १२० कोटी रूपये मिळणार होते, असेही वायसे-पाटील यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक सय्यद मौला, सुरेशसिंग गौड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मनालीजवळील रसेल, पुल, तोष, छलांग, तसोल, भूतल या परिसरात चरस तयार केले जाते. त्या ठिकाणाहून कारच्या सायलन्सरमध्ये भरून ते दिल्लीमध्ये आणले जाते. त्या ठिकाणी चरस विशिष्ट कागदामध्ये पॅकिंग केले जाते. त्यामुळे स्कॅनिंगमध्ये देखील दिसत नाही. हे चरस चिक्कीच्या स्वरूपात होते. त्यानंतर दिल्लीतून ते रेल्वेमार्गे देशातील वेगवेगळ्या शहरांत पाठविला जातो. या ठिकाणाहून चरसची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू असल्याची माहिती आरोपींच्या चौकशीतून मिळाली आहे. यातील आरोपी शर्माचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. तो पुण्यात पूर्वी देखील तीन ते चार वेळा येऊन गेल्याची माहिती आहे, असे अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी सांगितले.
हा चरस रेल्वेमार्गे महाराष्ट्र व इतर राज्यांत विक्रीसाठी आलेल्या दोघांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक कोटी तीन लाख रूपयांचा ३४ किलो ४०४ ग्रॅम चरस जप्त केले होते. मुंबई, पुणे, गोवा, बंगळुरू येथे ते विकले जाणार होते. या चरसची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत १२० कोटी रुपये किंमत आहे.

या प्रकरणी ललितकुमार दयानंद शर्मा (वय ४९, रा. व्हिलेज शमशी, भुंतर, जिल्हा कूलू) आणि कौलसिंग रुपसिंग सिंग (वय ४०, रा. बंद्रोल, कुलु) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शर्मा याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून, साथीदाराच्या मदतीने तो चरस विक्रीसाठी रेल्वेने आणला होता. पुण्यात दोन किलो, मुंबईत २२ किलो, गोवा पाच किलो आणि बंगळुरू येथे दोन किलो चरस विकणार होता. २८ डिसेंबरलाच चरसची विक्री केली जाणार होती. या आरोपींना २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती लोहमार्ग विभागाचे पोलिस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त कविता नेरकर-पवार उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page