पंतप्रधान मोदींचं कार्यालयच OLX वर! ४ जणांना अटक

पंतप्रधान मोदींचं कार्यालयच OLX वर! ४ जणांना अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदीय क्षेत्रातून एक आश्चर्य व्यक्त करणारा प्रकार समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाराणसीतील संसदीय कार्यालय काही समाजकंटकांनी थेट OLX वर थेट विक्रीस काढले आहे. या चकीत करणाऱ्या घटनेनंतर वाराणसी पोलिसांनी तातडीने या घटनेची दखल घेत चार जणांना अटक केली असून त्यांची चौकशी सध्या करण्यात येत असल्याची माहिती मिळतेय.

असा घडला प्रकार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीतील संसदीय कार्यालयाचा फोटो शेअर करत कार्यालय थेट ओएलएक्सवर विक्रीसाठी टाकले आहे. विक्रीसाठी त्याची किंमत साडेसात कोटी ठेवण्यात आली होती. ओएलएक्सवर देण्यात आलेल्या जाहिरातीत या कार्यालयातील खोल्या, पार्किंगची सुविधा आणि इतर माहिती देण्यात आली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने कारवाई करत गुन्हा दाखल करून चारजणांना अटक केली आहे.

दरम्यान ओएलएक्सवरील ही जाहिरात हटवली आहे. तसेच ज्या व्यक्तीने या कार्यालयाचा फोटो काढून ओएलएक्सवर अपलोड केला होता. त्यालाही अटक करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संसदीय कार्यालय वाराणसीत बनवले असून या कार्यालयात जनतेच्या अडचणी, समस्या मांडण्यात येत असतात. हे कार्यालय वाराणसीमधील भेलपूरमधील जवाहर नगर एक्सटेन्शनमध्ये आहे. याच कार्यालयात या मतदार संघातील जनतेशी पंतप्रधान मोदी संवाद साधत असतात.

 

अभिप्राय द्या..