इंदापूर (पुणे) : “ही माझी मुलगी नाही… तू आज माझ्या मागे ऊस तोडलेल्या मोळ्या बांधायला का आली नाहीस?”, असं म्हणत बायकोशी भांडणं करीत पहाटेच्या वेळी बापानेच दोन महिन्याच्या चिमुरडीचा नाक आणि तोंड दाबून हत्या केल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात घडला.
शक्तिमान काळे या हैवान बापाने दोन महिन्याच्या चिमुरडीची नाक आणि तोंड दाबून हत्या केली. याप्रकरणी चिमुरडीची आई सोनमने इंदापूर पोलिसांत तक्रार दाखल केलीय. 22 नोव्हेंबरला हैवान बापाने चिमुरडीची हत्या केली. पोटची पोरगी गेलीये, या दुखा:तून आई सावरली नव्हती. अखेर 17 डिसेंबरला हा सगळा प्रकार चिमुरडीच्या आईने पोलिसांसमोर कथन केला.

ऊस तोडणीच्या कामानिमित्त काळे कुटुंब इंदापूर तालुक्यातील करेवाडी येथे सध्या ऊस तोडणीचे काम करीत आहेत. सोनम हिचा नवरा सकटया उर्फ शक्तिमान काळे याने दिनांक 22 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री आठ वाजता करेवाडी येथील कोपीवर आला असता, त्याने त्याच्या बायकोसोबत भांडणे सुरु केली. “ही मुलगी माझी नाही, आज तू माझ्या मागे ऊस तोडलेल्या मोळ्या बांधायला का आली नाही,” असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे आरोपी शक्तिमान काळे याने दोन महिन्याच्या चिमुरडीचे तोंड आणि नाक दाबत असताना सोनम काळे या जाग्या झाल्या व त्यांनी पाहिले की आपला नवरा आपल्या दोन महिन्याच्या चिमुरडी हत्या करीत आहेत.

यावेळी त्या बाहेर आल्या व त्यांनी आरडाओरडा केली. यावेळी शेजारीच कोप्यात राहत असलेल्या कामगारांनी धाव घेतली. शेजाऱ्यांनी आरोपी शक्तीचा पाठलाग केला मात्र तो अंधाराचा फायदा घेऊन तेथून फरार झाला. स्वतःच्या पोटच्या गोळ्याला स्वतःचा नवरा नाक तोंड दाबून हत्या करीत असतानाची दृश्य सोनमने पाहिल्याने तिची घडलेल्या प्रकाराबद्दल काही बोलण्याची मानसिकता नव्हती, त्यावेळी तिने फक्त मुलीच्या मयताची खबर दिली, मात्र काल इंदापूर पोलिस ठाण्यात याच आईने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. आपल्याच नवऱ्याने आपल्या दोन महिन्याच्या चिमुरडीची हत्या केली असल्याचे तिने पोलिसांनी सांगितलं.

घडलेल्या प्रकाराची तीव्रता लक्षात घेऊन यावेळी पोलिसांनी तात्काळ खुनाचा गुन्हा नोंद करत, आरोपी सकटया उर्फ शक्तिमान काळे यास अटक केली. यासंदर्भात इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी अधिक तपास करीत असून घडलेल्या घटनेबाबत इंदापूर तालुका आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page