प्रेमासाठी प्रेमी युगुलाची आत्महत्या; तरुणीचा मृत्यू तर तरुण थोडक्यात बचावला

प्रेमासाठी प्रेमी युगुलाची आत्महत्या; तरुणीचा मृत्यू तर तरुण थोडक्यात बचावला

प्रेमासाठी वाटेल ते करण्याची बऱ्याच जणांची तयारी असते. मग प्रेमाकरता एखादी व्यक्ती कोणत्याही थराला जाते. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका प्रेमी युगुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामध्ये दुर्दैवाने प्रेयसीचा मृत्यू झाला असून प्रियकर मात्र, वाचला आहे. ही घटना पुण्यामध्ये घडली आहे. याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी आरोपी विरोधात उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

नेमके काय घडले?
पुण्यात राहणाऱ्या एका प्रेमी युगुलाचे एकमेकांवर प्रचंड प्रेम होते. हे दोघेही एकाच कंपनीत कामाला होते. त्याठिकाणीच त्यांचे एकमेकांवर प्रेम झाले. काही दिवसांनी तरुणाने नोकरी सोडली. मात्र, नोकरी सोडून देखील त्यांचे प्रेम काही कमी झाले नव्हते. परंतु, घरच्यांकडून प्रेमाला विरोध होईल, अशी भीती तरुणाच्या मनात होती. त्यामुळे त्या दोघांनी ७ डिसेंबर रोजी एकत्र विषप्रशान केले. त्यानंतर त्या दोघांनाही त्रास होण्यास सुरुवात झाला. दरम्यान, तरुणाने त्याच्या घरच्यांना याबाबत माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच तरुणाच्या घरच्यांनी तात्काळ धाव घेत दोघांना ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, शरीरात विष अधिक प्रमाणात पसरल्याने यामध्ये प्रेयसीचा मृत्यू झाला. तर तीन दिवसांच्या उपचारानंतर प्रियकराची तब्येत सुधारली.

मात्र, यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी तरुणाविरोधात उत्तमनगर पोलीस ठाणे गाठत तरुणाने आपल्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फिर्याद दिली. मात्र, दोघांनी नेमका कोणत्या कारणामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

अभिप्राय द्या..