सिंधूदुर्गनगरी /-
सेवाभावाने कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे कार्य समाजाला हितकारक असते. ‘घुंगुरकाठी-सिंधुदुर्ग’ या संस्थेने आतापर्यंत राबविलेले उपक्रम प्रेरणादायी आहेत, अशा शब्दांत खासदार विनायक राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘घुंगुरकाठी-सिंधुदुर्ग’ स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी आज श्री. राऊत यांची त्यांच्या तळगाव येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी श्री.राऊत यांना आपले ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हे ऐतिहासिक विषयावरील पुस्तक व संस्थेच्या उपाध्यक्षा डाॕ. सई लळीत यांचा ‘वांगड’ हा काव्यसंग्रह भेट दिला. यावेळी श्री. राऊत बोलत होते. आपल्या संस्थेने केलेल्या कामांची माहिती श्री. लळीत यांनी श्री. राऊत यांना दिली. आडाळी एमआयडीसी स्थानिक लोकाधिकार संरक्षण समिती स्थापन करुन संस्थेने तयार केलेल्या स्थानिकांच्या माहिती कोषाबाबतची कल्पना दिली. तसेच, आडाळी एमआयडीसीमधील पायाभूत सुविधांची कामे लवकर पूर्ण होण्यासाठी संस्थेने केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. आडाळी एमआयडीसीच्या पायाभूत सुविधांच्या कामावर आपण व्यक्तीशः लक्ष देऊन ही कामे वेळेत व दर्जेदार होतील, याचा पाठपुरावा निश्चितच करु, अशी ग्वाही त्यांनी दिली. संस्थेच्या कामाची प्रशंसा करुन श्री. राऊत म्हणाले की, स्वयंसेवी संस्था या समाजाला उपकारक असतात. या संस्था समाज आणि सरकारमधील दुवा म्हणून काम करतात. निरपेक्ष भावनेने केलेल्या अशा कामांचे महत्त्व मोठे असते. संस्थेच्या पुढील वाटचालीला खासदार राऊत यांनी शुभेच्छा दिल्या.