वर्ध्यात बँकेवर दिवसाढवळ्या दरोड्याचा थरार, साडे तीन किलो सोनं लुटलं !

वर्ध्यात बँकेवर दिवसाढवळ्या दरोड्याचा थरार, साडे तीन किलो सोनं लुटलं !

 

वर्धा: वर्ध्यातील मुथूट फिनकॉर्प या फायनान्स कंपनीच्या ऑफिसवर दिवसाढवळ्या दरोडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत सोने तारण कर्ज देणाऱ्या फायनान्स कंपनी दरोडा टाकला. ही घटना सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास घडली. पोलीस घटनास्थळावर पोहोचले असून त्यांच्याकडून तपास करण्यात येत आहे.
रोख रक्कम, सोने आणि दुचाकी चोरीला

बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत दरोडेखोर मुथुट फिनकॉर्पच्या कार्यालयात पोहोचले. दरोडेखोरांनी कार्यालयातील 3 लाख 18 हजार रुपयांची रोख रक्कम आणि साडे तीन किलो सोने नेले लुटून नेले. त्यांनी मुथूट फिनकॉर्पच्या एका कर्मचाऱ्याची दुचाकीदेखील चोरुन नेली आहे.

वर्धा शहरात खळबळ
सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास दरोड्याची घटना घडल्याने वर्धा शहरात खळबळ माजली आहे. लाखो रुपयांचा दरोडा घालून दरोडेखोर पसार झाले आहेत. मुथूट फिनकॉर्पच्या व्यवस्थापनाला गुंगारा देत दरोडेखोरांनी सोने, रोख रक्कम लुटून नेली. मुथुट फिनकॉर्पच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांच्या चेंबर पेटीतून रक्कम लंपास करण्यात आली.

दरोडेखोरांचे कृत्य  सीसीटीव्हीत कैद

दरोडेखोरांनी चोरी करताना मास्क घातले होते. मात्र, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून तपासाला सुरुवात झाली आहे. मुथूट फिनकॉर्पच्या कार्यालयात पोलिसांनी फिंगर प्रिंट आणि स्केच तयार करण्याचं काम सुरु केलं आहे. पोलिसांनी मुथूटच्या कर्मचाऱ्यांकडून घडेलेल्या प्रकाराची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, वर्धा शहरात दिवसाढवळ्या मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर दरोडा पडल्याने शहरात खळबळ पसरली आहे.

 

अभिप्राय द्या..