पिंपरी: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ५७ वर्षीय प्रौढ व्यक्तीचा अज्ञात दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला आहे. पिंपरीतील रिव्हर रोडवर सोमवारी (१४ डिसेंबर) सकाळी सव्वा सहा ते आठच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
राजू सुगनोमल वाधवा असे अपघातात मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. या प्रकरणी वाधवा यांचा मुलगा दीपक राजू वाधवा ( वय ३२, रा. लक्ष्मी धर्मशाळेच्या शेजारी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू वाधवा सोमवारी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर गेले होते. त्यावेळी पिंपरीतील रिव्हर रोड येथे त्यांना दुचाकीने पाठीमागून जोरात धडक दिली. वाधवा डांबरी रस्त्यावर पडल्याने त्यांच्या तोंडाला जखम झाली. उपचारासाठी त्यांना वायसीएम रूग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अपघातानंतर दुचाकीस्वार पसार झाला आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.