मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावर अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे या मार्गावरील वेगमर्यादा 80 किलोमीटर प्रतितासावरुन 60 किलोमीटर प्रतितास करण्यात आली आहे.

पुणे: मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. या मार्गावरुन प्रवास करताना आता तुम्हाला वेगाला वेसण घालावी लागणार आहे. कारण या मार्गावरील वेगमर्याता आता 80 किलोमीटर प्रतितासावरुन 60 किलोमीटर प्रतितास करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावरुन प्रवास करताना आता तुम्हाला वेगावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे.
मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावर अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलिसांकडून गाड्यांच्या वेगाला वेसण घालण्यासाठी हा उपाय करण्यात आलाय. बाह्यवळण मार्गावर कात्रज परिसरातील नवीन कात्रज बोगदा ते वारजे भागातील मुठा नदीवरील पुलापर्यंतच सर्वेक्षण नुकतच करण्यात आलं. या भागात वेगमर्यादा 80 किलोमीटर प्रतितासावरुन 60 किलोमीटर प्रतितास करण्यात आली आहे. या मार्गावर गेल्या महिन्यात गंभीर स्वरुपाचे एकूण 6 अपघात घडले आहेत. त्यामुळे ही उपाययोजना करण्यात आली आहे. त्याचबरोबर या भागात गतिरोधक, अपघात प्रवण क्षेत्राची माहिती देणारे फलक बसवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे.

मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ वाचणार!
पुणे-मुंबईमधील प्रवासाचे अंतर कापण्यास लागणारा वेळ आता कमी होणार आहे. त्यासाठी द्रुतगती महामार्गावरील सर्वांत अवघड टप्पा ठरणाऱ्या खंडाळा घाटमाथा परिसरात नव्या मार्गिका काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. याठिकाणी असणाऱ्या बोगद्याचे काम 2 किलोमीटरपर्यंत झाले आहे. द्रुतगती महामार्गावरील खंडाळा (बोर) घाटमाथा परिसरात अनेक नागमोडी वळणे तीव्र चढ उताराची आहेत. या क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. या परिसरात शेकडो अपघातांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो जण जायबंदी झाले आहेत. घाटमाथा परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यावर उपाय म्हणूनच हा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प राबवला जात आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

खोपोली एक्झीट ते कुसगाव (सिंहगड संस्था) दरम्यान 8 पदरी 2 बोगद्यांसह नवीन रस्ता करणे
बोगदा क्र. 1 : 1.75 कि.मी. लांबीचे दोन समांतर बोगदे
बोगदा क्र. 2 : 8.92 कि.मी. लांबीचे दोन समांतर बोगदे
बोगद्यांची रुंदी 21.45 मीटर असून भारतातील सर्वात जास्त रुंदीचा बोगदा होणार
मुंबई आणि पुण्याकडे जाणारे दोन्ही बोगदे दर 300 मीटर अंतरावर एकमेकांना क्रॉस पॅसेजव्दारे जोडण्यात येणार
खोपोली एक्झीट ते कुसगाव (सिंहगड संस्था) दरम्यान 8 पदरी 2 व्हाया डक्टसह नवीन रस्ता आणि खालापूर पथकर नाका ते खोपोली एक्झीट या रस्त्याचे 8 पदरीकरण करणे
व्हायाडक्ट क्र. 1 : 900 मीटर लांबीचे दोन समांतर पूल
व्हायाडक्ट क्र. 2 : 650 मीटर लांबीचे दोन समांतर केबल स्टे पूल
8 पदरीकरण : 5.86 किलोमीटर खालापूर टोलनाका ते खोपोली एक्झिट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page