कोल्हापुर /-
पदवीधर मतदार संघातील पराभवाच्या कारणामुळे कोल्हापुर जिल्ह्यातच भाजप मध्ये बंड झाल्याचे निदर्शनाला आले असून या जिल्ह्यातील भाजपच्याच काही जबाबदार कार्यकर्त्यांनी या पराभवाला प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाच जबाबदार धरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
भाजपचे जिल्हा सरचिटीस शिवाजी बुवा आणि भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते पी. डी. पाटील यांनी ही मागणी केली. त्यांनी पत्रकार परिषदेत या पराभवाचे खापर थेट चंद्रकांत पाटील आणि कोल्हापुर जिल्हा भाजप अध्यक्ष समरजीत घाटगे यांच्यावर फोडून या दोघांनीही त्वरीत राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केली.भाजपच्या निष्ठावंत,कार्यकर्त्यांच्यावतीने आम्ही ही मागणी करीत आहोत असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दोन्ही नेत्यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली नाही. पक्षात बाहेरून आलेल्या लोकांवरच ते विसंबून राहिले त्यामुळे भाजपच्या हक्काच्या मतदार संघात पराभव झाला.या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून चंद्रकांत पाटील आणि घाटगे यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी त्यांनी केलीे. पुणे विभाग पदवीधर मतदार संघात भाजपचे पारंपारीक वर्चस्व आहे. आणि खुद्द चंद्रकांत पाटील यांनी या मतदार संघातून प्रतिनिधीत्व केले होते. असे असतानाही भाजप उमेदवाराचा या मतदार संघात प्रचंड फरकाने पराभव झाल्याची बाब भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली आहे.