सिंधुदुर्गनगरी /-
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत २०२०- २१ मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या ६९ प्रस्तावना आजच्या सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीची सभा सभापती माधुरी बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑनलाईन संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा महिला बालकल्याण अधिकारी अमोल पाटील, समिती सदस्य संपदा देसाई, शर्वरी गावकर, संजना सावंत, वर्षा कुडाळकर, पल्लवी राऊळ, आदींसह खातेप्रमुख, तालुका बाल विकास अधिकारी, ऑनलाईन सभेत सहभागी झाले होते. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत २०२० २०२१ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या ६९ प्रस्तावना आजच्या सभेत मंजुरी देण्यात आली. यामध्ये महिलांना घरघंटी पुरवणे ३२ प्रस्ताव, शिलाई मशीन पुरवणे २८ प्रस्ताव ,तर मुलींना सायकल पुरवणे योजनेच्या ९ प्रस्तावांचा समावेश असल्याची माहिती सभेत देण्यात आली. आजच्या महिला व बाल विकास सभेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिंदळे गावच्या सुगंधा घाडी हिची महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघामध्ये निवड झाल्याबद्दल तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाला ,अखिल महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. तसेच जिल्हा परिषद सदस्य संजय पडते यांचे पुत्र देवेंद्र पडते यांचे अकाली निधन झाल्याबाबत आजच्या सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४५१ अंगणवाड्याना अद्यापही स्वतःच्या मालकीच्या इमारती नाहीत . या सर्व अंगणवाड्या शाळा इमारती, समाज मंदिरे, खाजगी घरे, अशा ठिकाणी चालविल्या जात आहेत. तरी ज्या ठिकाणी अंगणवाड्या साठी स्वतःच्या मालकीची इमारत नाही अशा ठिकाणी नवीन इमारत बांधकामासाठी जागा उपलब्ध व्हावी. या दृष्टीने प्रयत्न करा. संबंधित ग्रामपंचायत व स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे जागा उपलब्ध करण्यासाठी सहकार्य घ्या असे आदेश सभापती माधुरी बांदेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.