दोन दिवसांपूर्वी उरणच्या दिघोडे रानसई रस्त्याजवळ मृतदेह सापडला होता. सुरेश भोईर असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते वाशी गावातील रहिवासी होते. त्यांची हत्या चुलत भावानेच केल्याची माहिती समोर आली आहे.

 नवी मुंबई: उरणमधील दिघोडे रानसई रस्त्यालगत २ दिवसांपूर्वी मृतावस्थेत आढळून आलेल्या वाशी गावातील सुरेश भोईर (५२) यांची हत्या त्यांचाच चुलत भाऊ अनिरुद्ध ऊर्फ कुलदीप भोईर (२९) आणि त्याचा मित्र अनिल रायपुरे (१९) या दोघांनी केल्याचे उघडकीस आले आहे. उरण पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.

कर्ज झाल्यामुळे मृत्यूनंतर मिळणाऱ्या आयु्र्विमा पॉलिसीच्या पैशांतून आपल्या वारसांना हे कर्ज फेडता येईल, या हेतूने भोईर यांनीच आपली हत्या करण्यास सांगितल्याचा दावा या आरोपींनी पोलिस जबानीत केला आहे. मात्र पोलिसांचा त्यावर विश्वास नसून हत्येमागील खरे कारण पोलिस शोधत आहेत. फायनान्सचे काम करणारे वाशी गावातील सुरेश भोईर हे ६ डिसेंबर रोजी दुपारी आपल्या घरातून बाहेर पडले, मात्र ते घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार वाशी पोलिसांनी शोध सुरू केला असता ११ डिसेंबरला भोईर यांची कार दिघोडे रानसई मार्गालगत बेवारस स्थितीत आढळून आली होती.

उरण पोलिसांनी या कारजवळ जाऊन पाहणी केली असता कारपासून काही अंतरावर भोईर यांचा मृतदेहदेखील आढळला होता. भोईर यांची गळा आवळून व चिरून हत्या केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला होता. भोईर बेपत्ता झाले त्या दिवशी त्यांचा चुलत भाऊ कुलदीप भोईर आणि त्याचा मित्र अनिल रायपुरे हे त्यांच्यासोबत असल्याचे काहींनी सांगितले. तसेच मोबाइलच्या तांत्रिक तपासणीतही ही बाब स्पष्ट झाली. त्यामुळे उरण पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र नंतर त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली.

सुरेश भोईर यांच्यावर ८ लाख रुपयांचे कर्ज होते. तसेच त्यांची २५ कोटींची आयुर्विमासी देखील होती. भोईर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पॉलिसीच्या रकमेतून कर्जाची परतफेड करणे कुटुंबीयांना शक्य होईल यासाठी त्यांना मदत करण्यासाठी भोईर यांनीच आपली हत्या करण्यास सांगितल्याचा दावा आरोपींनी केला. मात्र पोलिसांनी हा दावा फेटाळला असून या दोघांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page