सिंधुदुर्ग / समील जळवी

कणकवली तालुक्यातील तळेरे येथील संदेश पत्र, हस्ताक्षर संग्राहक निकेत पावसकर यांनी लॉक डाऊन काळात देशभरातील विविध क्षेत्रातील एकूण 750 व्यक्तींना पत्राद्वारे संपर्क साधला. या काळात अनेकांची संदेश पत्रे आली असून हा पत्र प्रपंच अव्याहतपणे सुरुच आहे. यातील सर्वच पत्रे प्रिय आहेत मात्र डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्राने उत्साह अजून वाढला असल्याचे निकेत पावसकर यांनी सांगितले .गेल्या 14 वर्षांपासून विविध क्षेत्रातील व्यक्तींशी पत्राद्वारे संपर्क साधून त्यांच्या हस्ताक्षरातील संदेश पत्राचे संग्रह करणारे निकेत पावसकर यांच्या संग्रही 1200 पेक्षा जास्त व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रे आहेत. लॉक डाऊन मधील मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करीत त्यांनी आत्तापर्यंत विविध क्षेत्रातील 750 पेक्षा जास्त व्यक्तींना पत्रे पाठविली आहेत.त्यातील काहींची संदेश पत्रे आली असून अजून अनेकांची उत्तरे प्रतिक्षेत आहेत.
उत्साह वाढविणारे पत्र
तळेरे येथे या संग्रहाचे सुन्दर अक्षरघर असून त्या अक्षरघराला अनेक मान्यवरांनी भेट दिली आहे. गेल्या चार वर्षांपासून विख्यात शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना पाठविलेल्या पत्राला उत्तर हे हमखास येतेच. मात्र, अलिकडेच डॉ. जयंत नारळीकर यांनीही या अक्षरघराला भेट देणार असल्याचे पत्राने कळविले आहे. डॉ. नारळीकर यांच्या त्या पत्रामुळे अजुनच उत्साह वाढला असल्याचे निकेत पावसकर यांनी सांगितले.
यांची संदेश पत्रे दाखल
लॉक डाऊन काळात साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांची असंख्य संदेश पत्रे आलीत. त्यामध्ये डॉ. गणेश देवी, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. अविनाश सांगोलेकर, माधुरी शानभाग, आशा बगे, रामदास पाध्ये, अर्चना पाध्ये, सत्यजित पाध्ये, जोसेफ तुस्कानो, हेमंत देसाई, पोलीस उपअधिक्षक कृष्णात पिंगळे, ए. के. शेख, सुहास बारटक्के यांच्यासह अनेकांच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रे निकेत पावसकर यांच्या संग्रहात दाखल झालीत.
लॉक डाऊन काळात परदेशातील सर्व व्यवहार बंद आहेत. त्यामुळे परदेशातील व्यक्तींशी पत्रव्यवहार झालेला नाही. मात्र, परदेशातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या नामवंत 50 व्यक्तींची पत्रे तयार आहेत. परदेशातील दळणवळण सुरु होताच तिही पत्रे रवाना होतील अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. तर लॉक डाऊन असल्याने टपाल नेण्यासाठी सध्या पोस्टाची गाडी आठवड्यातून एकदाच येत असल्याने एखाद्या व्यक्तींच्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करणारे पत्र सुमारे महिनाभर अगोदर पाठवतो. त्यामुळे त्या व्यक्तीला शुभेच्छा वेळेवर पोहोच होत असल्याचे निकेत पावसकर यांनी सांगितले.
संदेश पत्र पोस्ट कार्डवरच का? या संग्रहाचे निमित्त ठरलेले मराठीतील ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांचे पहिले पत्र साध्या पोस्ट कार्डवर आले. तसेच पोस्ट कार्ड जपून ठेवणे सहज सोपे असल्याने संदेश पत्र पोस्टकार्डवरच घेतली जात असल्याचे निकेत पावसकर यांनी सांगितले.या संग्रहामुळे अनेक क्षेत्रातील व्यक्तींशी सबंध अधिक द्रुढ झाले आहेत. गेल्या 14 वर्षात अंदाजे पाच हजार व्यक्तींना दहा हजारपेक्षा जास्तवेळा पत्र व्यवहार केल्याचे यावेळी पावसकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page