मूंबई /-
परतीच्या पावसाने जोरदार झटका देत राज्यातील 34 जिल्ह्यांमधील सुमारे 62 लाख शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान केले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, कृषी मंत्री यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांनीही नुकसानीची पाहणी केली. राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात दोन हजार 297 कोटींची शेतकऱ्यांना मदत दिली. त्यानंतर दुसऱ्या हप्त्याची बळीराजाला प्रतीक्षा होती. केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता आता राज्य सरकारने पुरवणी मागणीद्वारे शेतकऱ्यांना दोन हजार 211 कोटींचा दुसरा हप्ता मंजूर केला आहे.
अधिवेशनानंतर वितरीत होईल मदतीची रक्कम
राज्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने दुसऱ्या हप्प्यात दोन हजार 211 कोटींची मदत दिली आहे. पुरवणी मागणीद्वारे ही मागणी अधिवेशनात ठेवली होती. डिसेंबरअखेर तथा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मदतीची रक्कम वितरीत केली जाईल.
– सुभाष उमराणीकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन, मुंबई
नैसर्गिक आपत्तींचा सामना करणाऱ्या बळीराजाला अद्याप हमीभावाची प्रतीक्षाच आहे. अडचणींवर मात करणारा जगाचा पोशिंदा नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीमुळे खचणार नाही, याची दक्षता राज्य सरकारकडून घेतली जाते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सोलापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांचा दौरा करुन ऑक्टोबरमधील अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी केली. राज्य सरकारने त्यासाठी कर्ज काढून मदतीचा पहिला हप्ता दिला. ‘खचू नका धीर, ठाकरे सरकार आहे खंबीर’ म्हणत मुख्यमंत्र्यांनी बळीराजाला दिलासा दिला. केंद्र सरकारने मदतीचे आश्वासन दिले असतानाही राज्य सरकारने त्याची वाट न पाहता बळीराजाला मदत दिली. दरम्यान, आता केंद्र सरकारकडे सुमारे अडीच ते तीन हजार कोटींची मदत मागितली जाणार असून तसा प्रस्ताव तयार केल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. तत्पूर्वी, मदतीची रक्कम बॅंकांनी कर्जापोटी वर्ग करु नये, अशा सक्त सूचनाही राज्य सरकारने बॅकांना दिल्या आहेत. त्यामुळे आता मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा केली जाणार आहे.
ठळक बाबी…
अधिवेशनाच्या पुरवणी मागणीद्वारे अतिवृष्टीच्या भरपाईसाठी मागितले होते बावीसशे कोटी
मदत व पुनर्वसन विभागाच्या मागणीनुसार राज्य सरकारने दिली मदतीच्या रकमेला मंजुरी
अधिवेशनानंतर डिसेंबरअखेर तथा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वितरीत केली जाईल रक्कम
राज्यातील 34 जिल्ह्यांमधील तब्बल 62 लाख शेतकऱ्यांना बसला होता अतिवृष्टीचा फटका
पहिल्या टप्प्यात मदत न मिळालेल्यांना दिली जाणार आहे.