आरोपी शुभम शाहूने बल्क मेसेज सुविधांचा वापर करत ट्रॅव्हल कंपनी, सोनाराला गंडवले

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेल्या तरुणाला ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ झाली. प्रेयसीला खुश करण्यासाठी तरुणाने विमानाची तिकीटं, फाईव्ह स्टार हॉटेलचे बुकिंग, सोन्याच्या दोन बांगड्या अशी पैशांची उधळण केली. मात्र बॉलिवूडमध्ये चित्रपट लेखक म्हणून कार्यरत तरुणावर आता तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली.

देशात कोरोनाचे साईड इफेक्ट हळूहळू समोर येत आहेत. मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे बंद किंवा प्रभावित झाले आहेत, तर कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. त्याचबरोबर मोठ्या संख्येने नागरिक रोजगारही गमावून बसले आहेत. मुंबईत बॉलिवूडमध्ये फिल्म रायटिंगचे काम करणारा एक तरुण कोरोनामुळे नोकरी गमावून बसला होता. नोकरी नसल्याने त्याच्याकडे पैसे नव्हते. म्हणून त्याने आपल्या प्रेयसीला आकर्षित करण्यासाठी जो मार्ग पत्करला, त्यामुळे त्याला आता गजाआड व्हावे लागले.

28 वर्षांचा शुभम पितांबर शाहू… ओशिविरा आदर्श नगरमधून शनिवारी त्याला अटक करण्यात आली. अटकेचं कारण ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. कारण शाहू लॉकडाऊनमुळे बेरोजगार झाला होता. मुलुंडमध्ये राहणाऱ्या यूट्युबर प्रेयसीला खुश करण्यासाठी त्याने एका टूर कंपनीच्या माध्यमातून जयपूरला जाणारी विमानाची दोन तिकिटं आणि एक आठवड्यासाठी फाईव्ह स्टार हॉटेलही बुक केले होते. त्याचबरोबर प्रेयसीसाठी सोन्याच्या दोन बांगड्याही त्याने खरेदी केल्या होत्या. ही सर्व खरेदी त्याने चुकीच्या पद्धतीने केल्याचं उघड झालं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपी शाहूने जेव्हा ट्रॅव्हल्सचे तिकीट बुक केले, तेव्हा त्याने पैसे न देता ट्रॅव्हल्स कंपनीचा बँक अकाउंट नंबर मागून घेतला. खात्यात NEFT च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करण्याचे त्याने सांगितले. काही मिनिटात ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकिणीच्या मोबाईल नंबरवर कोटक बँकेचा मेसेजही आला. मात्र हा मेसेज कुठल्या बँकेचा नसून तो आरोपी शाहूने स्वतः बल्क मेसेज सुविधांचा वापर करत पाठवला होता. विश्वास बसावा म्हणून त्याने शंभर रुपये आपल्या खात्यातून पाठवून पैसे पाठवण्याची पोचपावतीही सेंड केली होती. असाच त्याने ज्वेलरलाही चुना लावला. ट्रॅव्हल्स कंपनी आणि इतरांनी आपापला बँक खात्यात बॅलेन्स चेक केला तर त्यांच्या खात्यात पैसेच आले नव्हते. म्हणून ट्रॅव्हल्स कंपनीची मालकिणीने पोलिसात गुन्हा दाखल केला.

या प्रकरणात टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकिणीने ओशिवरा पोलीस ठाण्यात आरोपी शुभम पितांबर शाहू याच्याविरोधात कलम 420 467 465, IT 66 C आणि D प्रमाणे गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली. या घटनेमुळे एकीकडे आरोपी तुरुंगात पोहोचला तर दुसरीकडे त्याची प्रेयसी जिच्यासाठी त्याने हे सर्व केलं, तिचीही नाराजी ओढवली आहे. त्यामुळे आधीच गोत्यात असताना शुभमचा पाय आणखी खोलात गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page