‘आपल्या देशाला आपली गरज आहे. संकटाच्या वेळी आपल्या शिक्षणाचा देशासाठी उपयोग होत नसेल, तर आपण शिकून काय फायदा,’ या विचाराने पेशाने परिचारिका असलेल्या कीर्तिका खांडेकर आपल्या दोन मुलांसह केनियाहून भारतामध्ये दाखल झाल्या ठाणे
‘आपल्या देशाला आपली गरज आहे. संकटाच्या वेळी आपल्या शिक्षणाचा देशासाठी उपयोग होत नसेल, तर आपण शिकून काय फायदा,’ या विचाराने पेशाने परिचारिका असलेल्या कीर्तिका खांडेकर आपल्या दोन मुलांसह केनियाहून भारतामध्ये दाखल झाल्या. मूळच्या बदलापूरच्या रहिवासी असणाऱ्या कीर्तिका आपल्या पतीबरोबर दक्षिण अफ्रिकेत एक वर्षासाठी गेल्या. परंतु मार्च महिन्यात भारतामध्ये करोनाचे संकट वेगाने पसरले. अशा वेळी त्यांच्या मनातील रुग्णसेवेची आस त्यांना स्वस्थ बसू देईना. करोना काळात वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी बजावलेल्या उत्तम कामगिरीत आपलाही थोडा वाटा असावा, या हेतूने त्या भारतात परतल्या.
मार्च महिन्यापासून संपूर्ण जगाला करोनाने विळखा घातला. वैद्यकीय क्षेत्रातील करोनायोद्धा रात्रंदिवस करोना रुग्णांची सेवा करण्यासाठी झटत होते. अशा वेळी आपल्या देशाला आता आपली सगळ्यात जास्त गरज आहे, हा विचार कीर्तिका यांना स्वस्थ बसू देईना. अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जास्तीत जास्त नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. कीर्तिका यांनी आपल्या मनातील विचार आपले पती संतोष खांडेकर यांना बोलून दाखवला. त्यांनीही परवानगी आणि पाठिंबा दिल्याने दीड वर्षाच्या आणि पाच वर्षांच्या मुलांना घेऊन त्यांनी सप्टेंबर महिन्यात थेट भारतात परतून महाराष्ट्र गाठले. भारतात परतल्यानंतर १५ दिवसांनी बदलापूर येथील गौरी हॉल येथील कोविड केंद्रामध्ये कीर्तिका परिचारिका म्हणून रुजू झाल्या. कीर्तिका काम करत असलेल्या केंद्रामध्ये सुरुवातीला ताप आणि दम लागणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. करोनाची लागण झालेले एक वर्षाचे बाळसुद्धा कीर्तिका यांच्या सेवेमुळे बरे झाले. तेथील रुग्ण, त्यांचे नातेवाईक घरी जायच्या आधी कीर्तिका आणि इतर कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानून आवर्जून फुले, चॉकलेट आदी देऊन जातात.
काम केल्याचे समाधान
वैद्यकीय पेशात असणाऱ्या सगळ्यांनी सर्वसामान्य नागरिकांचा विचार सर्वप्रथम करायला हवा. आपल्या ज्ञानाचा वापर देशाच्या कल्याणासाठी जास्तीत जास्त कसा करता येईल, हे बघायला हवे. करोनामुक्त झालेल्या रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे आशीर्वाद आणि प्रेम बघून काम केल्याचे समाधान मिळते,’ असे कीर्तिका खांडेकर यांनी सांगितले.