मालवण /
आघाडी सरकारच्या काळातच रस्त्यांची चाळण झाली हा… लोकांचे कंबरडी मोडली…. रस्त्यांवरून प्रवास करणारो प्रत्येकजण सरकारच्या नावानं शिव्या शाप देता… लोकांचे शाप खरे ठरांदे आणि या सरकार लवकरच खड्ड्यांमध्येच जावंदे… असा मालवणी बोलीभाषेत गाऱ्हाणे घालत मालवण तालुका भाजपच्या वतीने शनिवारी कसाल-मालवण खड्डेमय रस्तेप्रश्नी कुणकावळे येथे ‘खड्डेपुजा’ आंदोलन छेडण्यात आले.
दरम्यान, येत्या आठ दिवसात खड्डेमय रस्ता दुरुस्ती व डांबरीकरण काम सुरू न झाल्यास कोणतीही पूर्व सूचना नदेता रस्त्यावर तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा भाजप पदाधिकारी यांनी दिला आहे.
भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सभापती अजिंक्य पाताडे, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बाबा परब व उपसभापती राजू परुळेकर यांच्या
नेतृत्वाखाली हे अनोखे लक्षवेधी आंदोलन प्रशासन व सत्ताधारी यांना जाग आणण्यासाठी छेडण्यात आले. यावेळी तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, दादा नाईक, युवमोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशिष हडकर, राजन माणगावकर, महेश वाईरकर, मामा बांदिवडेकर, सतीश वाईरकर, मकरंद सावंत, विनीत भोजने, जयेंद्रथ परब, विजय निकम, चेतन मुसळे, जगदीश चव्हाण, सागर वाईरकर, समीर शेख, संजय पाताडे, बाबा कुबल, आबा पोखरणकर, अमित चव्हाण यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मालवण पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस बंदोबस्त तैनात होता. काही काळ वाहतूक ठप्प झाली. भटजींच्या उपस्थितीत दादा नाईक यांच्या हस्ते रस्त्यावरील खड्ड्यांची पूजा करत खड्ड्यातून जनतेचे अपघात व जीव वाचावं असेही साकडे यावेळी घालण्यात आले.
राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
रस्त्यांची कामे करा नाहीतर खुर्च्या खाली करा… आघाडी सरकार हाय हाय… अश्या जोरदार घोषणा यावेळी भाजप पदाधिकारी यांनी दिल्या. सत्ताधारी आमदार, खासदार व पालकमंत्री यांच्या कारभारावर तीव्र संताप यावेळी व्यक्त करण्यात आला. आमचे नेते नारायण राणे यांच्या सत्ता कारकिर्दीत रस्ते व्हायचे तेव्हा पाच पाच वर्षे खड्डे पडत नव्हते. आता दरवर्षीच खड्डे. ही प्रत्येक रस्त्याची स्थिती आहे. हे सरकार जाणार तेव्हाच जनतेची खड्यातून मुक्ती होणार असा तीव्र संताप यावेळी व्यक्त करण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता पल्लवी मनसुख या आंदोलन स्थळी हजर झाल्या. कसाल मालवण मार्गावर २४ किलोमीटर रस्ता विशेष दुरुस्तीअंतर्गत डांबरीकरण साठी ४ कोटी १२ लाख निधी मंजूर असून कोल्हापूर येथील डी. आर. कन्स्ट्रक्शन यांना यांना फेब्रुवारी २०२० मध्ये कार्यरंभ आदेश देण्यात आले. डांबरीकरण सुरवात झाली मात्र कोरोना लॉक डाऊन त्यांनंतर निसर्ग चक्री वादळ व पाऊस यात काम थांबले. त्यांनंतर शासनाने १८ मे रोजी प्रगतीपथावरील काम थांबवण्याचे आदेश दिले. त्यानुसार काम थांबले आहे. आम्ही काम सुरू करण्याबाबत परवानगी मागितली आहे. तोपर्यंत खड्डे बुजवण्याची कार्यवाही आम्ही सुरू करतो. असे लेखी पत्र बांधकाम अभियंता यांनी आंदोलन कर्त्याना दिले. मात्र यावर भाजप पदाधिकारी यांचे समाधान झाले नाही. अपघात घडून लोकांचे मृत्यू होण्याची वाट बांधकाम विभाग पाहत आहे का ? असा सवाल तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी उपस्थित केला.
पोट ठेकेदार नेता कोण ?
सभापती अजिंक्य पताडे व उपसभापती राजू परुळेकर अधिकच आक्रमक बनले. बांधकाम विभाग व सत्ताधारी यांचे साटेलोटे आहे. ठेकेदारांची मर्जी सांभाळण्याचे काम बांधकाम विभाग करते आहे. सर्वसामान्य जनतेशी सत्ताधारी व बांधकाम विभाग यांचे काहीच देणेघेणे नाही का ? असा संतप्त सवाल सभापती अजिंक्य पाताडे यांनी उपस्थित केला. तर या कामाचा पोट ठेकेदार नेता कोण असा सवाल उपसभापती राजु परुळेकर यांनी उपस्थित करत सर्व काही जनतेला माहीत आहे. असे सांगत सत्ताधार्यांना लक्ष केले.
अन्यथा जनतेचा उद्रेक होईल..
रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यावर खड्डे बुजवण्याची थुकपट्टी नको. रस्त्यावर डांबरीकरणच झाले पाहिजे. येत्या आठ दिवसात काम सुरू न झाल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता रस्त्यावर तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाईल. असा इशारा यावेळी भाजप पदाधिकारी यांनी दिला.