आर्थिक व्यवहार, भ्रष्टाचार, मनी लॉंड्रिंग, पैशांची अफरातफर अशा अनेक प्रकरणात धनदांडग्यांपासून ते राजकारण्यांना घाम फोडणरे अंमलबजावणी संचलनालय ( ईडी ) स्वतः जागेचा शोध घेण्यामध्ये व्यस्त आहे. ईडीने ऑफिसच्या जागेचा शोध गेल्या वर्षभरापासून सुरू केला आहे. पण ईडीच्या अटी व शर्थीतल ऑफिस शोधूनही सापडेना अशीच स्थिती सध्या अंमलबजावणी संचलनालयाची झालेली आहे. त्यामुळे जागेच्या शोधात गेल्या वर्षभरापासून ईडीची शोध मोहीम सुरू आहे.
अंमलबजावणी संचलनालय ( ईडी ) मार्फत सध्या मुंबईत कार्यालयीन जागेसाठी ऑफिसची शोधाशोध सुरू झाला आहे. मुंबईत एक अवाढव्य ऑफिसच्या जागेचा शोध सध्या ईडी प्रशासनामार्फत सुरू झाला आहे. जवळपास ३० हजार स्केअरफूटपेक्षा अधिक जागेच ऑफिस ईडीच्या रडारवर आहे. शिवाय या ऑफिसला जोड म्हणजे पार्किंगची जागा आणि पुरेसा वीज, पाणी पुरवठा यासारख्या अटी ठेवत ईडी प्रशासनाने एका नव्या ऑफिसचा शोध सुरू केला आहे. ईडी ऑफिससाठी जागा शोधत आहे, याबाबतची एक नोटीस काढत मुंबईत जागा हवी आहे असे इडीने यामध्ये म्हटले आहे. जवळपास ३१ हजार ७४८ स्क्वेअर फूट इतक्या कारपेट एरियाच ऑफिस ईडी शोधत आहे. महत्वाच म्हणजे ईडी प्रशासनाला ऑफिससाठी हवी असलेली जागा ही बॅलार्ड इस्टेट, फोर्ट, कुलाबा, नरिमन पॉईंट यासारख्या जागेतच हवी आहे.
ईडीने जाहीर केलेल्या नोटीशीत या जागेचा वापर हा वाणिज्यिक तत्वावर होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच थेट जागेच्या मालकाकडूनच ही जागा वापरण्यासाठी घेण्यात येईल. कोणत्याही ब्रोकरला यामध्ये व्यवहारासाठी वाव नाही असे या नोटीशीत स्पष्ट करण्यात आले आहे. या संपुर्ण प्रक्रियेसाठी एक निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येईल. त्यामध्ये तांत्रिक आणि बोली प्रक्रियेच्या टप्प्यानंतरच ही निविदा प्रक्रिया पुर्ण करण्यात येईल असे ईडीमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. टेक्निकल निविदा प्रक्रियेत निविदा प्रक्रिया सुरू करण्याची तारीख, सामान्य अटी व शर्थी आणि कराराच्या संबंधित नियमांचा समावेश असेल. तर बोली प्रकियेत महिन्यापोटीचे भाडे आणि इतर शुल्काचा समावेश असे नोटीशीत स्पष्ट करण्यात आले आहे. निविदा प्रक्रियेतील इच्छुकांनी येत्या ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन ईडी प्रशासनाने केले आहे.