१ जानेवारीपासून मिळणार वेतनवाढ
देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. परंतु आता हळूहळू अनलॉक अंतर्गत देशातील सर्व परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. करोना काळात अनेक कंपन्यांनी कर्मचारी, वेतन कपात तसंच पगारवाढ नाकारली होती. परंतु माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोनं आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कनिष्ठ श्रेणीतील (बी ३ आणि त्या खालील) कर्मचाऱ्यांच्या वेतनात १ जानेवारीपासून वाढ केली जाणार आहे.
कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात १ जानेवारीपासून तर मध्यम श्रेणीतील (सी १ आणि त्यावरील) कर्मचाऱ्यांच्या वेतनात १ जून पासून वेतनवाढ केली जाणार आहे. बी ३ या श्रेणीच्या १.८ लाख कर्मचाऱ्यांना या वेतनवाढीचा फायदा होणार आहे. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. याव्यतिरिक्त उत्तम कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीदेखील देण्यात येणार आहे. ऑफ-शोअर कर्मचाऱ्यांना ६ ते ८ टक्के आणि नॉन साईट स्टाफला ३ ते ४ टक्के वेतनवाढ देण्यात येणार आहे. महासाथीचा फटका बसलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या पुन्हा पूर्वपदाव येताना दिसत आहेत. विप्रोची वार्षिक वेतन वाढ ही साधारणत: जून महिन्यापासून प्रभावीपणे लागू करण्यात येते.
“आमच्या कर्मचाऱ्यांनी या कठीण काळातही निरंतर सेवा पुरवण्यासोबत सेवेच्या मापदंडांनाही पूर्ण केलं आहे. विप्रोनं आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या तिसऱ्या तिमाहीत आणि चौथ्या तिमाहीत सर्व कर्मचाऱ्यांसाठी १०० टक्के व्हेरिएबल पेची घोषणा केली असल्याची माहिती कंपनीनं टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली.
यावर्षी ६ जुलै रोजी विप्रोनं थिएरी डेलापोर्ट यांची कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती केली होती. आतापर्यंत थिएरी एखदाही कार्यालयात गेले नाहीत. परंतु ते कंपनीशी जोडले गेल्यापासूनच कंपनीच्या शेअर्समध्ये ७० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. जुलैपासून त्यांनी आतापर्यंत विप्रोच्या बंगळुरू येथील मुख्यालयाचा एकदाही दौरा केला नाही. परंतु व्हर्च्युअल बैठकांद्वारे ते कामकाजावर लक्ष ठेवून आहेत. ६ जुलै रोजी विप्रोचे शेअर्स २२० रूपयांवर होते. परंतु थिएरी कंपनीशी जोडले गेल्यानंतर शेअर्सच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात विप्रोच्या शेअर्समध्ये ७० टक्क्यांची वाढ होऊन ते ३८१ रूपयांपर्यंत ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरापर्यंत पोहोचले होते.