विरोधासाठी विरोध दर्शवायचा ही शिवसेनेची भूमिका

शेतीतलं शिवसेनेला काय कळतं? शेती हा शिवसेनेचा विषय नाही. शिवसेनेला तेवढी अक्कलही नाही. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध दर्शवायचा म्हणूनच शिवसेनेने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे अशी टीका माजी खासदार आणि भाजपाचे नेते निलेश राणे यांनी केली आहे. मोदी सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनाला देशभरात संमिश्र प्रतिसाद मिळतो आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत बोलत असताना निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

शिवसेना हा प्रचंड गोंधळलेला पक्ष आहे. या पक्षाचा उतरता काळ सुरू झाला आहे. त्यामुळे त्यांची पतही घसरु लागली आहे. दिल्लीतही शिवसेनेला कुणी किंमत देत नाही. अलीकडच्या काळात कोणत्या एका भूमिकेवर शिवसेना ठाम राहिल्याचे दिसून आलेले नाही. ते रोज खोटं बोलतात, एक दिवस महाराष्ट्राची जनताच त्यांची दखल घेणं बंद करेल. त्यानंतर शिवसेना हा पक्षच अदखलपात्र ठरेल असंही निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

कृषी कायद्यांमध्ये बदल केला जावा अशी मागणी शरद पवार यांनी दहा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१० मध्येच केली होती. त्यामुळे आता ते या कायद्यांना का विरोध करत आहेत ते अनाकलनीय आहे. पंतप्रधान नरेंध्र मोदी यांनी कायदा आणला म्हणून या कायद्याला विरोध दर्शवला जातो आहे. फक्त पंजाबमध्ये कृषी कायद्यांविरोधातली तीव्रता जास्त आहे. इतर कोणत्याही राज्यात अशी परिस्थिती नाही असंही निलेश राणे यांनी स्पष्ट केलं.

कृषी कायद्यांचा विरोध दर्शवत शेतकऱ्यांचं मागील १२ दिवसांहून जास्त काळ आंदोलन सुरु आहे. दिल्लीत कडाक्याच्या थंडीत, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं यांच्यासह शेतकरी आंदोलन करत आहेत. कृषी कायदे मागे घेण्यात यावेत ही या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे. आज शेतकऱ्यांनी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासह प्रमुख  सगळ्या विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान २०१० मध्ये शरद पवारांनी लिहिलेलं पत्र दाखवून भाजपाने त्यांना त्यांच्या मागण्यांची आठवण करुन दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page