शेतकरी संघटनांनी उद्या, ८ डिसेंबर रोजी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला महाविकास आघाडीनं पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या उद्याच्या बंदला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज या संदर्भातील शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना राज्यातील जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

‘उद्याचा बंद हा वेगळ्या प्रकारचा बंद आहे. यात राजकीय पक्षांचा सहभाग असला तरी हा राजकीय बंद नाही. कुठल्याही राजकीय पक्षाच्या वा संघटनेच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी हा बंद नाही. देशातील शेतकऱ्यांचा आवाज बुलंद व्हावा. गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर थंडी, वारे व सरकारच्या दडपशाहीची पर्वा न करता जे शेतकरी बांधव बसले आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी हा बंद आहे,’ असं राऊत म्हणाले.

‘लॉकडाऊनच्या काळात आपण सगळे घरात बसलेलो असताना एकटा शेतकरी राजा राबत होता. आज त्यांनी आपल्याला साद घातलीय. त्याला गरज आहे. त्यावेळी आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं. त्यामुळं हा जनतेनं स्वेच्छेनं बंदमध्ये सहभागी व्हावं व बळीराजाच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करावी,’ असं आवाहन त्यांनी केलं आहे.

केंद्रीय कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी देशातील विविध सरकारांना लिहिलेल्या एका पत्रावरून भाजपनं सध्या राष्ट्रवादी काँग्रेसला घेरलं आहे. या पत्रात पवार यांनी खासगीकरणाची गरज व्यक्त केली होती, असं सांगण्यात येत आहे. त्याबाबत संजय राऊत यांनी भाष्य केलं. ‘२०१० ची परिस्थिती वेगळी असेल, आताची वेगळी आहे. त्याबद्दल स्वत: पवार साहेब सांगतील. ते देशातले कृषी क्षेत्रातील मोठे तज्ज्ञ व शेतकरी नेते आहेत. शेवटी शेतकरी नेता हा शेतकऱ्यांच्या भावनांशी सहमत असतो. लाखो शेतकरी रस्त्यावर उतरले असताना कोणताही नेता त्यांच्या भावनेशी प्रतारणा करणार नाही,’ असं राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page