देशात सध्या शेतकरी आंदोलनावरुन वातावरण तापलं असून अनेक राज्यांमध्ये त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे. उत्तर प्रदेशात समजवादी पक्षाकडून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र उत्तर प्रदेश सरकारने या रॅलील परवानगी दिली नव्हती. रॅलीला सुरुवात झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना ताब्यात घेतलं आहे. याआधी घराबाहेर बॅरिकेट्स लावत त्यांना रोखण्यात आलं होतं. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर अखिलेश यादव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आंदोलन सुरुच राहणार असल्याचं सांगितलं आहे.

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिलेश यादव यांनी राज्यात किसान यात्रा करत आंदोलन करण्याचं आवाहन केलं होतं. राज्यातील जनतेने या नव्या कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरावे आणि चालत, सायकलवर, मोटरसायकलवर किंवा ट्रॅक्टरवर बसून या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यावा असं अखिलेश यादव यांनी सांगितलं होतं. परंतु, या आंदोलनात सामील होण्याआधीच त्यांना घरातच रोखण्यात आलं होतं.

यानंतर अखिलेश यादव आंदोलनासाठी कनौज येथे निघाले असता पोलिसांनी त्यांच्या गाड्या रोखल्या. यानंतर अखिलेश यादव आणि त्यांच्या समर्थकांना तिथे रस्त्यावर घोषणाबाजी करत आंदोलन करण्यास सुरुवात केली. यावेळी अखिलेश यादव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं की, “आमचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी आंदोलन करत आहेत. त्यांना हवं असेल तर ते आम्हाला जेलमध्ये टाकू शकतात. त्यांनी आमच्या गाड्या थांबवल्या आहेत, आम्ही चालत जाऊ”. यानंतर पोलिसांनी कारवाई करत अखिलेश यादव आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतलं.

 

शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला विरोधकांचा पाठिंबा
दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या मंगळवारच्या ‘भारत बंद’ला काँग्रेससह विरोधकांनी रविवारी पाठिंबा जाहीर केला. विरोधकही मैदानात उतरल्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बळ मिळालं आहे. केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली राजधानीच्या सीमेवर गेल्या ११ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. शेतकरी नेते आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चेच्या अनेक फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी संघटना ठाम आहेत.

केंद्र सरकार नवे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी मान्य करीत नसल्याने शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, डावे पक्ष आणि दहा प्रमुख कामगार संघटनांनीही शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला पाठिंबा दिला होता. आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तेलंगण राष्ट्र समिती, ‘आप’, शिवसेना आदी पक्षांनीही ‘भारत बंद’ला पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा जाहीर करणारे संयुक्त निवेदन विरोधकांनी काढले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page