पेट्रोलियम कंपन्यांनी सलग चौथ्या दिवशी इंधन दरवाढ केली आहे. आज पेट्रोल २७ पैसे तर डिझेल २५ पैशांनी महागले. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८३ पार गेला आहे. मुंबईत देखील पेट्रोल डिझेलमधील दरवाढ सुरुच आहे.
जागतिक बाजारातील तेजीने देशांतर्गत पेट्रोलियम कंपन्यांचा तेल आयातीचा खर्च वाढला आहे. तेलाची आयात महागल्याने कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. आज शनिवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ करण्यात आली. पेट्रोल २७ पैशांनी महागले आहे. डिझेलमध्ये २५ पैशांची वाढ झाली.
तेल उत्पादक देशांची संघटना ओपेकने जानेवारीपासून उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. करोना प्रतिबंधात्मक लसीच्या उत्पादनाने वेग घेतला असून लवकरच काही देशांमध्ये लसीकरण सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था सुरळीत होऊन इंधन मागणी वाढेल, असा अंदाज ओपेकने व्यक्त केला आहे. त्यामुळे जानेवारीपासून कच्च्या तेलाच्या उत्पादनात दरर्ज ५० लाख पिंपाची वाढ केली जाणार आहे. या वृत्ताने जागतिक कमॉडिटी बाजारात तेलाच्या भावात तेजी आली आहे.
दरवाढीने मुंबईत पेट्रोलचा भाव एक लिटरसाठी ८९.७८ रुपये आहे. डिझेलचा भाव ७९.९३ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलने ८३ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८३.१३ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७३.३२ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलचा भाव ८६ रुपये झाला असून डिझेल ७८.६९ रुपये झाले आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८४.६३ रुपये असून डिझेल ७६.८९ रुपये आहे.
दरम्यान कमॉडिटी बाजारात तेलाचा भाव शुक्रवारी १.०३ टक्क्यांनी वधारला आणि तो प्रती बॅरल ४६.०६ डॉलर झाला. ब्रेंट क्रूडचा भाव १.१३ टक्क्यांनी वधारून ४९.२५ डॉलर प्रती बॅरल झाला. तेलाचा भाव लवकरच ५० डॉलरच्या घरात जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.