मालवण /-

मालवण शहरातील पंकज संतोष गावडे हा जगात दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या बॉम्बे ब्लड ग्रुप रक्तगटाचा कोकणातील पहिला रक्तदाता आढळल्या नंतर मालवण तालुक्यात या दुर्मिळ रक्तगटाचे आणखी तीन रक्तदाते मिळून आले आहेत. सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांनी हे चारही दुर्मिळ रक्तदाते शोधले असून यामुळे मालवणात जागतिक दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या बॉम्बे ब्लड ग्रुपचा खजिनाच मिळून आला आहे. नव्याने आढळलेल्यांपैकी दोन जण वायरी मधील असून एक महिला मूळ रेवंडीची आहे. सध्या ती मुंबईस वास्तव्यास आहे. हे तीनही जण नातेसंबंधातील आहेत. जागतिक लोकसंख्येत ०.०००४ % अर्थात १० लाखांमध्ये ४ रुग्ण बॉम्बे ब्लड ग्रुपचे आढळून येतात. मात्र मालवणात रेवतळे, रेवंडी व वायरी या २५ किमीच्या अंतरातच बॉम्बे ब्लड ग्रुपचे तब्बल ४ रक्तदाते मिळून आले आहेत. ही बाब मालवणच्या दृष्टीने अतिशय समाधानकारक असल्याची भावना व्यक्त होत आहे.

तालुक्यातील वायरी भुतनाथ येथे मालवणकर निवास न्याहारी सभागृहात सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या एका विशेष कार्यक्रमात मालवण कार्यकारीणी जाहिर करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असणारी उद्घोषणा संस्थेचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी केली. मालवणची व पर्यायाने सिंधुदुर्गची श्रीमंती अशा शब्दात ही उद्घोषणा करण्यात आली. पुन्हा एकदा मालवणात तीन दुर्मिळ रक्तगट बॉम्बे ब्लड ग्रुपचे दाते सापडले आहेत.

यामध्ये सौ. हर्षदा हरेश पडवळ- मालवणकर व सुधीर चंद्रकांत कांबळी अशी यातील दोघांची नावे आहेत. याशिवाय रेवंडी येथील सौ. मेघा मंगेश माडये या देखील बॉम्बे ब्लड ग्रुपच्या दात्या मिळून आल्या आहेत. यातील मेघा माडये या मुंबईत वास्तव्यास असतात. ही नावे जाहिर करताच उपस्थित सर्वांनी जोरदार टाळ्याच्या कडकडाटात त्यांचे स्वागत व अभिनंदन करत आनंद व्यक्त केला. यावेळी दोन्ही दात्यांना संस्थेच्यावतीने गौरवचिन्ह, सन्मानपत्र, शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात अाले. काही आठवड्यापूर्वीच पंकज संतोष गावडे याचा अस मालवणात करण्यात आला होता. कार्यबाहुल्यामुळे पंकज कार्यक्रमास उपस्थित राह शकले नाहीत.

विशेष म्हणजे श्री. सुधीर हे सौ. हर्षदा यांचे भावोजी आहेत. व सौ. मेघा या बहिण आहेत. जागतिक लोकसंख्येत ०.०००४ टक्के म्हणजेच दहा लाखात ४ असे प्रमाण असणाऱ्या या रक्तगटा बाबतचे हे जागतिक गणित मालवणने मोडित काढले आहे. मालवणच्या रेवतळे,रेवंडी व वायरी या सुमारे पंचवीसएक हजार लोकसंख्येमध्येच या रक्तगटाची ४ माणसे आढळली आहेत.

सुधीर कांबळी यांना त्यांचा रक्तगट १९९१ ला ते नववीत असताना कळला होता. परंतु त्यावेळी तो इतका दुर्मिळ व जागतिक महत्त्वाचा आहे हे माहित नव्हतं. ओ रक्तगट समजून पुढे त्यांनी ४ वेळा रक्तदानही केले आहे. त्यांची बहिण यांना त्याचवेळी पाचवीत असताना हा रक्तगट कळला. व सौ. हर्षदा यांनी कॉलेजमध्ये असताना ३ वेळा रक्तदान केले आहे. मात्र त्यांच्या ६ वर्षापूर्वी झालेल्या प्रसुती दरम्यान हा रक्तगट बॉम्बे ब्लड ग्रुप असल्याचे समजले. यावेळी त्यांना कोल्हापूर सिपीआर येथे पाठविण्यात आले, मात्र सर्वत्र धावपळ करुनही त्यांना या रक्तगटाचे रक्त सापडले नाही, सुदैवानेच त्या सहिसलामत बचावल्या. यावेळी जिल्ह्यातील ख्यातनाम स्त्रीरोगतज्ञ डॉ. ज्ञानेश्वर सोडल यांनी त्यांना धीर दिला होता. तसेच त्यांना रक्त मिळावे म्हणून सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे मालवण देवगड विभाग संघटक मनोज दुधवडकर यांनी पराकोटीचे प्रयत्न केले होते. म्हणून या कार्यक्रमात मनोज दुधवडकर यांच्याच हस्ते सौ. हर्षदा पडवळ (मालवणकर) यांना गौरवचिन्ह व मालवण शाखा अध्यक्ष सौ. शिल्पा खोत यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन तर मालवण शाखा उपाध्यक्ष मंदार गावडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. यावेळी सर्पमित्र व सर्पमित्र संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आनंद बांबाडेकर यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page