आचरा समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाला जीवरक्षकाकडून जीवदान..

आचरा समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाला जीवरक्षकाकडून जीवदान..

आचरा /-

आचरा येथील समुद्रात समुद्र स्नानाचा आनंद घेणाऱ्या दोन पर्यटकांपैकी एक पर्यटक पाण्यात काही अंतरावर गेल्यावर बुडू लागल्याने किनाऱ्यावर आचरा ग्रामपंचायती मार्फत तैनात असलेल्या अक्षय वाडेकर या जीवरक्षकाने तात्काळ समुद्रात धाव घेऊन बुडत असलेल्या पर्यटकास वाचवत जीवदान दिले. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. दिवाळी सुट्टीपासून मालवण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असून समुद्र किनारे फिरण्यास पर्यटक पसंती देत आहेत. आचरा गावातही पर्यटक दाखल झाले असून आचरा समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी रेलचेल आहे. काही पर्यटक समुद्र स्नानाचा आनंद घेण्यासाठी व पाण्यात डुंबण्यासाठी समुद्रात उतरत आहेत. शनिवारी सायंकाळी आचरा समुद्र किनाऱ्या लगत असलेल्या रिसॉर्ट मधील पर्यटक आपल्या कुटुंबासमवेत किनाऱ्यावर दाखल झाले होते. त्यातील दोन पुरुष सदस्य समुद्रात अंघोळीचा आनंद लुटण्यासाठी उतरले होते. त्यातील सागर शंकर बेलेकर (वय ३४, रा. कोल्हापूर कागल) हा तरुण खोल पाण्यात गेल्यामुळे बुडू लागला. त्याच्या समवेत असलेला त्याचा साथीदार पोहता येत असल्याने किनारा गाठू शकला. तरुण बुडत असल्याचे किनाऱ्यावर असलेला जीवरक्षक अक्षय वाडेकर याने पाहिले असता त्याने धाव घेत पोहत बुडणाऱ्या पर्यटकास गाठत त्याला किनाऱ्यावर आणले. अक्षय वाडेकरच्या तत्परतेने एका पर्यटकास जीवदान मिळाले आहे. जीवरक्षक अक्षय वाडेकरने दाखवलेल्या धाडसा बद्दल आचरा सरपंच प्रणया टेमकर व उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी यांनी कौतुक केले.

अभिप्राय द्या..