मालवण /-
कोरोना मुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या मालवण पालिकेकडून शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. गेले काही महिने विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दिवाळी हंगामात पर्यटकांचा ओघ वाढल्याने पालिकेने केलेल्या कारवाईत १० दिवसात १० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. सर्वाधिक दंड वसुली विनामास्क फिरणाऱ्या पर्यटकांकडून करण्यात आली आहे.
पर्यटकांचा ओघ वाढल्याने शहरातील सर्व किनारपट्टी भाग व पर्यटन ठिकाणांवर गर्दी होत आहे. येणारे पर्यटक विनामास्क फिरत असल्याचे दिसून येत आहेत. पालिकेकडे असलेल्या अपुऱ्या कर्मचारी वर्गाची संख्या लक्षात घेता सर्वच ठिकाणी कर्मचारी नियुक्त करणे शक्य नाही. मात्र भरड नाका, बाजारपेठ, रॉकगार्डन, किनारपट्टी याठिकाणी फिरून पालिका कर्मचारी दंड वसुली करत आहेत. पर्यटन व्यावसायिक, दुकानदार यांनीही स्वतः मास्कचा वापर करावा. तसेच पर्यटकांना आवाहन करत मास्कचा सक्तीने वापर करावा अशा सूचना कराव्यात असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
शहरातील हॉटेल व लॉज व्यावसायिकांना पालिका प्रशासनाने सूचना पत्र जारी केले आहे. कोविड खबरदारी नियमांचे काटेकोर पालन करावे. मास्क, सोशल डिस्टन्स नियमांचे पालन व्हावे. तसेच मास्क सक्तीबाबत पर्यटकांना प्रबोधन करावे अशा सूचना पालिका प्रशासनाने हॉटेल व लॉज व्यावसायिकांना दिल्या आहेत. अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली.
शहरात येणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण रॉकगार्डन आहे. याठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढला असून विनामास्क असलेल्या कोणत्याही पर्यटकाला रॉकगार्डन येथे प्रवेश दिला जाणार नाही. यासह दंडात्मक कारवाई केली जाणार नाही. ‘नो मास्क नो एन्ट्री’ असे धोरण असल्याचे नगराध्यक्ष श्री. कांदळगावकर यांनी स्पष्ट केले.
शहराची वाटचाल कोरोना मुक्तीच्या दिशेने सुरू आहे. गेल्या सात दिवसात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शहरात सापडून आला नाही. सद्य:स्थितीत शहरात केवळ २ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.