चौके /-
काळसे गावचे सुपुत्र असलेले आणि सध्या खारघर नवी मुंबई येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले श्री. हरेष बाळकृष्ण काळसेकर आणि त्यांचे बंधू सिंधुदुर्ग पोलीस दलात कार्यरत असलेले श्री. प्रमोद बाळकृष्ण काळसेकर यांनी सुट्टी कालावधीत काळसे गावी आले असताना मंगळवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी काळसे धामापूर गावातील आणि परिसरातील तरुणांना काळसे हायस्कूल येथे पोलीस भरतीची पूर्वतयारी कशी करावी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याचे सखोल मार्गदर्शन केले.
माजी विद्यार्थी सेवा संस्था काळसे, श्री शिवाजी वाचन मंदिर काळसे आणि काळसे हायस्कूल यांच्या साहाय्याने सदर पोलीस भरतीपुर्व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री शिवाजी वाचन मंदिर काळसे चे अध्यक्ष श्री. सिताराम ( दाजी ) वसंत परब, काळसे हायस्कूलचे शिक्षक राजेंद्र परब , अविनाश परब, तसेच शिवनंदन प्रभु , हितेंद्र काळसेकर, ओझर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक डी. डी. जाधव सर उपस्थित होते. या मार्गदर्शन शिबिराचा काळसे धामापूर गावासह कुडाळ , वेंगुर्ला, मालवण येथील ३५ तरुण तरुणींनी लाभ घेतला.
येणाऱ्या काळात होणारी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रमाणेच आपल्या गावातील तरुणही पोलीस खात्यात चांगल्या पदांवर नियुक्त व्हावेत या भावनेतून काळसे गावचे सुपुत्र तथा काळसे हायस्कूलचे माजी विद्यार्थी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. हरेष काळसेकर यांनी काळसे गावातील आणि परिसरातील तरुणांना पोलीस भरतीसाठी पूर्वतयारी करताना कोणती पुस्तके वाचावीत मैदानी परीक्षेसाठी कशी तयारी करावी याचे बहुमोल मार्गदर्शन केले.