नगराध्यक्ष समीर नलावडे ,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह शिष्टमंडळाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी..
कणकवली /-
कणकवली नगरपंचायत हद्दीतील पटकीदेवी ते नागवे करंजे हा प्रमुख जिल्हा मार्ग आहे . सदर रस्ता कणकवली नगरपंचायत हद्दीमधून जात असून रहदारीचा रस्ता आहे. त्या रस्त्याला पावसामुळे जागोजागी खड्डे पडले असून रस्ता पुर्णपणे खड्डेमय झाला आहे. त्यामुळे रस्त्यावरून वाहतूक व रहदारी करणे नागरिकांना अत्यंत त्रासदायक होत आहे. गावाचे प्रमुख ग्रामदैवत स्वयंभू मंदिर असून ३० नोव्हेंबरला गावची जत्रा भरणार असल्याने गावागावातून येणाऱ्या भाविकांना व या गावच्या नागरिकांना एकमेव मार्ग असल्याने रस्त्याचा रहदारीकरीता मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे . त्यामुळे सदर रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ३० नोव्हेंबर पुर्वी तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी.जेणेकरून नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करणे सुखकर होईल . अन्यथा आपल्या विरोधाल तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह शिष्टमंडळाने अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्रीमती के. के.प्रभू यांना दिला आहे.
श्री. नलावडे यांच्यासह शिष्टमंडळाने श्रीमती प्रभू यांची भेट घेत या रस्त्याबाबत लक्ष वेधले आहे. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अभिजीत मुसळे, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेवक शिशीर परुळेकर, किशोर राणे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन विठ्ठल देसाई, सुशील पारकर आदी उपस्थित होते.
याबाबत निवेदन दिले त्यात सदर रस्ता खड्ड्यामुळे खराब झाला असल्याने समोरून येणाऱ्या वाहनाना त्रास होत आहे. अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावेळी श्रीमती प्रभू यांनी सदर रस्ता बजेटमधून प्रस्तावित असून त्याची वर्क ऑर्डर झालेली नसल्याने काम रखडले आहे. पण वर्क ऑर्डर ची वाट पाहू नका तातडीने रस्त्याची डागडुजी करा,अशी मागणी श्री नलावडे व शिष्टमंडळाने केली. त्यावर तात्पुरती डागडुजी करण्यासाठी काम प्रस्तावित आहे. मात्र त्याचीही अद्याप वर्कऑर्डर झालेली नसल्याचे श्रीमती प्रभू यांनी सांगितले. डांबरीकरणाचे जे काम करण्यात येईल त्याची कॉलिटी असायला हवी.काम सुरू करताना शहराच्या हद्दीत काम असल्याने नगरपालिकेचे प्रतिनिधी तेथे थांबून काम करून घेतील असे नगराध्यक्ष श्री नलावडे यांनी सांगितले . तर सदर रस्त्याचा दर्जा शहरातील हद्दी पुरता अवनत करून दिल्यास त्या भागातील जमीनमालकांना बांधकामे करणे सोपे जाईल अशी मागणी हर्णे यांनी केली. त्यावर दर्जा अवनत करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन श्रीमती प्रभू यांनी दिले. २९ नोव्हेंबर पूर्वी सदर रस्ता सुस्थितीत करा अशी मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली.