कुडाळ /-
पंधरा दिवसापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याला नुकसान भरपाईपोटी सव्वापाच कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती दिली होती. तसेच या नुकसानभरपाईचे वितरण देखील दिवाळीपूर्वी करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार असे वक्तव्य केले होते. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापर्यंत एक दमडीही जमा झाली नाही. त्यामुळे ते सव्वा पाच कोटी रूपये गेले कुठे, असा सवाल जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकातून उपस्थित केला.
या प्रसिध्दी पत्रकात देसाई यांनी म्हटले की, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भातशेतीची फार मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली होती. यावेळी।नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली होती. त्याला अनुसरून तातडीने सर्व नुकसानीचे पंचनामे देखील प्रशासनामार्फत करण्यात आले होते.
सुमारे पंधरा दिवसापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याला नुकसान भरपाईपोटी सव्वापाच कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती दिली होती. तसेच या नुकसानभरपाईचे वितरण देखील दिवाळीपूर्वी करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार असे सांगितले होते, मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापर्यंत एक रुपयाही जमा झाला नसून आधीच वाढीव वीज बिलामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला नुकसानभरपाईची रक्कम प्राप्त न झाल्यामुळे त्यांची दिवाळी अंधारातच गेली. प्रशासनाकडे याबाबत चौकशी केली असता सदर निधी हा केवळ गेल्या महिन्यातल्या नुकसान भरपाईपोटी प्राप्त झालेला नसून गेल्या दोन-तीन वेळच्या नुकसान भरपाई पोटी प्राप्त झालेला असल्याची माहिती दिली. तसेच या निधीच्या वितरणाबाबत अद्यापपर्यंत वरिष्ठ पातळीवरून कोणतेही निर्देश न आल्यामुळे या नुकसानभरपाईचे वाटप देखील होऊ शकले नाही आहे, अशी माहिती दिली. त्यामुळे राज्य शासनाला शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे गांभीर्य नाही हे स्पष्ट झाले आहे. शासनाने नुकसान भरपाईपोटी प्रतिगुंठा जाहीर केलेली रक्कम ही मुळातच अत्यंत कमी असून जाहीर केलेली नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांना देण्यात येत नाही. त्यामुळे शासनाने आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अंत पाहू नये असे सांगत पुढील पाच दिवसात नुकसानभरपाई खात्यात जमा न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकर्यांच्यावतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले