नायर हॉस्पिटल मध्ये मेट्रन या पदावर आहेत कार्यरत..
मसुरे /-
मुंबई येथील प्रसिद्ध नायर हॉस्पिटलच्या मेट्रन आणि कुडाळ- आवळेगाव येथील सिंधू कन्या सौ. ऋचा राजेश साळगावकर यांना ‘ झी युवा ‘ संजीवनी पुरस्काराने कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आले. ऋचा साळगावकर यांनी कोरोनाच्या कालावधीमध्ये केलेल्या गौरवास्पद कामगिरीची दखल घेऊन सदर पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.
कोरोनाने घातलेल्या थैमानात नागरिकांचे संरक्षण आणि रुग्णांची सुश्रुषा करण्यात आरोग्य सेवेतील डॉक्टर्स, नर्सेस व इतर सेवकवर्ग आणि सुरक्षा रक्षक या नात्याने पोलीस कर्मचारी गेले आठ महिन्यांहून अधिक काळ अव्याहतपणे कोरोनाविरोधातील लढ्यात योद्धा म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत. काहींनी तर आपले कर्तव्य बजावतांना अमूल्य जीव गमावले आहेत. आजाराचे स्वरूप ओळखून ऋचा साळगावकर यांनी रुग्णांचा आजारापासून बचाव आणि सुटका करण्याचा ध्यास घेतला आहे.आपल्या कुटुंबियांएव्हढीच काळजी घेणाऱ्या ऋचा साळगावकर यांनी प्राणाची बाजी लावून नायर हॉस्पिटल मध्ये कोरोना योद्धा म्हणून काम पाहिले. झी युवा टिव्हीने ग्रँड मेडिकल कॉलेज आणि जे.जे. हॉस्पिटल्सचे माजी डीन,आयुष्य टास्क फोर्स चे प्रमुखआणि नामांकित तज्ञ डॉक्टर पद्मश्री श्री.तात्याराव लहाने , महाराष्ट्र राज्य कोरोना टास्क फोर्स चे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांच्या हस्ते ऋचा साळगावकर यांना मुंबई येथे सन्मानित करण्यात आले. कोरोना योद्धा चा संजीवनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर सौ. साळगांवकर यांनी गेल्या आठ महिन्यातील अनुभव श्रवण करतांना उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळून आले. स्वतः सह आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेची योग्य काळजी घेत साळगावकर मॅडम यांनी स्वतःला रुग्णसेवेच्या कर्तव्याला वाहून घेतले आहे. हॉस्पिटलमधील रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधोपचारांवर विशेष लक्ष ठेवत रुग्णांच्या तब्येतीची त्या नेहमीच आदराने चौकशी करीत असतात. पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.