वेंगुर्ला /-
सध्या चालू असलेल्या कोरोना व्हायरस च्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शिक्षण हे मागील बऱ्याच कालावधीपासून ऑनलाईन पद्धतीने चालू आहे.सध्या चालू असलेल्या ऑनलाईन शिक्षणातून एक विरंगुळा म्हणून सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल या प्रशालेने १४ नोव्हेंबर रोजी बालदिनाचे औचित्य साधून आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक आगळा वेगळा उपक्रम राबविला.यामध्ये प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा यांनी पं. जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.त्यानंतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देशातील विविध राज्यातील पारंपरिक वेशभूषा करून त्याप्रमाणे त्या त्या राज्यातील भाषेमध्ये विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वतः विद्यार्थी बनून विद्यार्थ्यांचा नर्सरी ते दहावी पर्यंत चा शाळेतील प्रवास यावर छोटीशी नाटिका ऑनलाईन पद्धतीने सादर केली. उर्वरीत शिक्षकांनी शाळेची विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी दर्शविणारे शानदार नृत्य सादर केले.अशाप्रकारे संपूर्ण कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने सादर करून सिंधुदूर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल च्या वतीने विद्यार्थ्यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या.