कारवार येथील युवकाचा शिरोडा समुद्रात बुडून मृत्यू..

कारवार येथील युवकाचा शिरोडा समुद्रात बुडून मृत्यू..

वेंगुर्ला /-

तालुक्यातील शिरोडा वेळागर येथील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या कारवार-हळीयर येथील तरुणाचा बुडून मृत्यु झाला,अशी नोंद शिरोडा पोलीस दूरक्षेत्रात झाली आहे.
कारवार-हळीयार येथील २४ वर्षीय युवक नित्यानंद जयवंत गौडा हा आपल्या मित्रांसोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आला होता. आज सकाळी त्या सर्वांनी रेडी येथील गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर फिरत फिरत ते सर्वजण दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शिरोडा-वेळागर येथील समुद्र किनाऱ्यावर आले. तेथील सुरुची बाग आणि निळाक्षार समुद्र पाहून ते भारावून गेले. त्यातच नित्यानंद याला आंघोळीचा मोह आवरला नाही. त्यामुळे तो आंघोळीसाठी समुद्राच्या पाण्यात उतरला. दुपारची वेळ असल्याने किनाऱ्यावर कुणी नव्हते. दरम्यान आंघोळ करताना समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने नित्यानंद पुढे पुढे गेला आणि बुडाला. त्याला पाण्याबाहेर काढेपर्यंत खूप उशीर झाला होता. या बाबत त्याचा मित्र शिवा कानोजी याने शिरोडा पोलिसात या दुर्घटनेची माहिती दिली आहे. दरम्यान पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक डी. के.पालवे, पोलीस कॉन्स्टेबल पी.एन. वेंगुर्लेकर, होमगार्ड चौकेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. शवविच्छेदन साठी मृतदेह रेडी येथील आरोग्य उपकेंद्रात नेण्यात आला आहे. या बाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.

अभिप्राय द्या..