वेंगुर्ला /-
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी व जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून शिरोडा गावात कोरोना विषाणू महामारीच्या काळात गावात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी स्वतः च्या जीवाची पर्वा न करता उल्लेखनीय सेवाकार्य करीत असलेल्या सर्व विभागातील अधिकारी , कर्मचारी व स्वयंसेवक यांचा तसेच लॉकडाऊन काळात विविध उपक्रमाद्वारे सेवा व सहकार्य करणाऱ्या संस्था यांचा शिरोडा ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन व मास्क भेट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार शंकर कांबळी , वेंगुर्ला पंचायत समिती सदस्य मंगेश कामत , शिरोडा सरपंच मनोज उगवेकर , उपसरपंच रवी पेडणेकर , माजी सरपंच बाबा नाईक , राजन गावडे , शुभांगी कासकर यांच्या शुभहस्ते मार्च २०२० पासून सद्यस्थितीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविणारे डॉक्टर , परिचारिका , आरोग्य तपासणी व विलगीकरण तसेच “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहीम यशस्वी करणारे आरोग्य अधिकारी , आरोग्यसेवक, आरोग्य सेविका , आशा सेविका , अंगणवाडी सेविका , मदतनीस यांचा कोरोना योद्धा म्हणून विशेष सत्कार करण्यात आला . त्याच प्रमाणे गर्दी नियंत्रणासाठी व शासकीय नियम पाळण्यासंदर्भात चांगल्या प्रकारे नियोजन करणारे पोलीस अधिकारी , होमगार्ड , ग्रामपंचायत कर्मचारी , पोलीस पाटील , धान्य दुकान सोसायटी चालक , स्वयं स्फूर्तीने काम करणारे स्वयंसेवक , विलगीकरण कक्ष साठी उपलब्ध करून दिलेल्या शाळा व सेवा बजावलेल्या मुख्याध्यापक , शिक्षक , महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कार्यालय शिरोडा चे अधिकारी व कर्मचारी , शिरोडा व्यापारी संघटना अध्यक्ष , त्याच प्रमाणे परप्रांतीय व गरीब गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य पुरवणारे व उपक्रमांसाठी सहकार्य केल्या बद्दल लुपिन फाउंडेशन सिंधुदुर्ग , श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान कमिटी शिरोडा , अनादी सनातन मानवता धर्म विश्वशांती संस्था सोनसुरे , शिरोडा मच्छिमार सोसायटी , श्री सचिन गावडे , आर्सेनिक गोळ्या उपलब्ध करून देणारे डॉ. जगताप , रुग्णवाहिका सेवा दिलेले ऑटोरिक्षा चालक मालक संघटना गांधीचौक शिरोडा यांचाही कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी व्यासपीठावर माऊली देवस्थान कमिटी चे आनंद नाबर , लुपिन फाउंडेशन चे परब , शिरोडा ग्रामपंचायत सदस्य कौशिक परब , संजय फोडनाईक, समृद्धी धानजी , प्राची नाईक , वेदिका शेट्ये आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन त्र्यंबक उर्फ भाऊ आजगावकर यांनी केले. ग्रामविकास अधिकारी सुनील चव्हाण यांनी उपस्थित मान्यवर व कोरोना योद्ध्याचे आभार मानले त्याच प्रमाणे विविध उपक्रम राबविणारे संस्था , लोक प्रतिनिधी यांचे ही ग्रामपंचायत शिरोडा कडून आभार मानण्यात आले . यावेळी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमी जगणारे कलाकार आणि रंगभूमीला जगवणारे रसिक प्रेक्षक याना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व ग्रामस्थांना कोरोना अंतर्गत शासकीय नियमांचे पालन करून सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले.