कणकवली /-
खा. नारायण राणेंना आव्हान देण्याची स्वतःची खरोखरच योग्यता आहे की नाही, हे शिवसेनावासी झालेल्या सतीश सावंत आणि संजय पडते यांनी एकदा स्वतःच्या अंतरात्म्याला विचारून पाहण्याची गरज आहे. तुमचे आव्हान आम्ही कधीही स्वीकारून नीतेश राणेंना राजीनामा द्यायला सांगून त्यांना पुन्हा मैदानात उतरु. पण भाजपाच्या जीवावर उगवलेले तुमचे खासदार आणि दोन्ही आमदार यांनीही राजीनामा देऊन पुन्हा एकदा त्यांच्या बरोबरीने निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवावी. चारही निवडणूका लढवायचे एकदा काय ते होऊनच जाऊ दे. एकदाच काय ते दूध का दूध और पानी का पानी होऊन जाईल आणि यापुढे जनता कोणाची हद्दपारी करणार हे सुद्धा दिसेलच. आमचे हे आव्हान स्वीकारा आणि तुमच्या इथल्या आमदार-खासदारांच्या राजीनाम्याचा एकदा काय तो मुहूर्त ठरवा. तुमचे हद्दपारी करून दाखवण्याचे आव्हान स्वीकारून आम्ही नितेश राणेंना राजीनामा द्यायला सांगतो. पण आमदार वैभव नाईक, दीपक केसरकर आणि खासदार विनायक राऊत या तिघांनीही राजीनामा द्यावा. चारही निवडणुका एकाच वेळी होऊन जाऊ द्या, मग हद्दपारी काय असते ते जनता तुम्हाला दाखवून देईल. खूप झाली राणेंना आव्हानांची भाषा, आता एकदाच काय ती मर्दानगी दाखवून निवडणुकीच्या रणमैदानात उतरून तर दाखवा, हद्दपारी काय असते ते आम्ही तुम्हाला हद्दपार करूनच दाखवून देऊ, असा आरपारचा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष श्री राजन तेली यांनी शिवसेनेच्या सतीश सावंत आणि संजय पडते या जोडगोळीला दिला आहे.